आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत मागणार्‍या बालिकेचा वॉचमनकडून विनयभंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वडिलांशी बोलण्यासाठी मदत मागण्यास गेलेल्या एका बालिकेला वॉचमनने अश्लील छायाचित्रे दाखवून तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. सुदैवाने ती त्याच्या तावडीतून सुटली. बालिकेच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून त्या वॉचमनविरुद्ध गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. 28 जूनपर्यंत त्याला पोलिस कोठडीत डांबण्यात आले आहे. दिल्लीतील निर्भया अत्याचार प्रकरणानंतर अस्तित्वात आलेल्या बाल लैंगिक शोषणविरोधी कायदा 2012 अन्वये दाखल झालेला हा औरंगाबादेतील पहिलाच गुन्हा आहे.

एन-12, छत्रपतीनगरातील या मध्यमवर्गीयांच्या वसाहतीत या बारावर्षीय बालिकेचे वडील लाँड्रीचा व्यवसाय करतात. 23 जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिला दुचाकीवर बसवून तिचे वडील ग्राहकांना कपडे देण्यासाठी जात होते. घरापासून काही अंतरावर त्यांची दुचाकी घसरली. यामुळे दोघांना मुका मार लागला. यानंतर बालिकेला तिच्या वडिलांनी घरी पाठवले.

कॉइन बॉक्स बंद होता म्हणून
त्याच वेळी धुणीभांडीचे काम आटोपून घरी परतलेल्या आईला तिने दुचाकी घसरल्याने वडील जखमी झाल्याची माहिती दिली. ‘आता तुझे बाबा कुठे आहेत?’ अशी विचारणा केल्यावर तिने ‘मला माहिती नाही,’ असे उत्तर दिल्याने तिची आई काळजीत पडली. वडिलांना मोबाइलवरून फोन लाव, असे आईने तिला सांगितले. ती घरासमोरील एका दुकानावर असलेल्या कॉईन बॉक्सवर फोन करण्यासाठी गेली. मात्र, तो बंद असल्याने ती ओळखीच्या नय्यर हाउसिंग सोसायटीतील वॉचमन शेख गफार शेख चांद (41, मूळ रा. बीड) याच्याकडे गेली.

हात धरला आणि..
‘चाचाजी, कॉईन बॉक्स बंद आहे. मला वडिलांशी बोलायचे आहे. तुमच्या मोबाइलवरून त्यांना फोन लावून देता का?’ अशी विचारणा केली. गफारने स्वत:च्या मोबाइलवरून तिचे वडिलांशी बोलणे करून दिले. वडील सुखरूप आहेत, हे लक्षात आल्याने ती आनंदाने घरी निघाली. तेवढय़ात गफारने तिचा हात धरत थांबवून घेतले आणि ‘हे पाहा माझ्या मोबाइलमध्ये आणखी काय काय आहे,’ असे म्हणत महिलांची अश्लील छायाचित्रे दाखवली. हा प्रकार पाहून बालिका घाबरली. ‘चाचा मला का दाखवताय हे, मला कशाला थांबवताय?,’ असे कापर्‍या आवाजात तिने विचारले. त्यावर तो गडबडून गेला. ‘तू पुन्हा येथे येऊ नये म्हणूनच मी तुला अशी चित्रे दाखवली,’ असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ही बालिका त्याच्या हाताला हिसका देत पळत सुटली आणि थेट घरी पोहोचली.

तो फरार झाला होता
थोड्या वेळाने वडील घरी परतल्यावर बालिकेने हा भयंकर प्रकार त्यांच्या कानी घातला. संतापलेल्या माता-पित्यांनी तत्काळ सोसायटीच्या इमारतीकडे धाव घेतली. मात्र, तेथे वॉचमन नव्हता. तो फरार झाला होता.

मोबाइलवरून काढला आरोपीचा माग
बालिकेच्या आई-वडिलांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात धाव घेऊन रविवारी रात्री एकच्या सुमारास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपनिरीक्षक विलास ताटीकोंडलवार यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवली. गफार काम करत असलेल्या सोसायटीच्या अध्यक्षांशी संपर्क साधत त्यांच्याकडून त्याचा मोबाइल क्रमांक मिळवला. सायबर शाखेच्या मदतीने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. बनावट नावाने त्याच्याशी संपर्क साधत छत्रपतीनगरातील एका गल्लीत बोलावले. मंगळवारी रात्री आठ वाजता तो तेथे येताच ताटीकोंडलवार यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी झडप टाकून त्याला जेरबंद केले.

तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद
गफारला बुधवारी (26 जून) विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सावंत यांच्यापुढे सादर करण्यात आले. त्यांनी त्याला 28 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बाल लैंगिक शोषणविरोधी कायदा 2012 अन्वये कलम 11 व 12 (बालकांशी अश्लील वर्तन करणे) नुसार शेख गफार याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद आहे.