आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुली म्हणतात, सिगारेट फुंकणारा नवरा नको गं बाई !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दहावीत शिकणा-या देशभरातील शालेय विद्यार्थिनींनी सिगारेटचे व्यसन नसलेल्या मुलाशीच लग्न करण्याचा निर्धार केला आहे. व्यसन सुटणारच नसेल तर वेळप्रसंगी लग्न मोडण्याचा इशारा या मुलींनी दिला आहे. धूम्रपान बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


हेल्थकेअर फाउंडेशन ऑफ इंडिया व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या देशव्यापी सर्वेक्षणातून हे वास्तव समोर आले. मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध शहरांत 115 कॉन्व्हेंट शाळांतील दहावीच्या 2500 मुलींची मते यात जाणून घेण्यात आली. पॅसिव्ह स्मोकिंगचा त्रास : तीन टक्के मुलींनी अधूनमधून सिगारेट ओढत असल्याचे मान्य केले. 26 टक्के मुलींना घरातील इतर सदस्यांच्या धूम्रपानाचा (पॅसिव्ह स्मोकिंग) त्रास होतो. यापैकी 80 टक्के मुलींनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला; परंतु यात यश आले नाही. उर्वरित मुलींची मात्र विरोध करण्याची हिंमतच झाली नाही. 58 टक्के मुलींनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणा-यांना हटकण्याचा प्रयत्न केला. तर, 38 टक्के मुली कोणी सिगारेट ओढत असेल तर तेथून गुपचूप निघून जातात. 4 टक्के मुलींनी आजूबाजूला कोण काय करतंय याची फिकीर नसल्याचे सांगितले.


आग्रहानंतरही धूम्रपान करणार नसल्याचे 95 टक्के मुलींनी सांगितले. 5 टक्के मुलींना बॉयफे्रंडच्या आग्रहाखातर झुरका घेणे गैर वाटत नाही. 86 टक्के मुलींना धूम्रपान हानिकारक वाटते. एखाद्या डॉक्टरला धूम्रपान करताना बघितले तर याबाबत आपले मत बदलणार असल्याचे 14 टक्के मुलींनी सांगितले.


72 टक्के मुलींचा नकार
72 टक्के मुलींनी सिगारेट ओढणा-या मुलाशी विवाह करणार नसल्याचे सांगितले. भावी पतीची ही सवय लग्नापूर्वीच सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा या मुलींचा मानस आहे. तो तयार झालाच नाही तर कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी लग्न करणार नाही, असा निर्धार या मुलींनी व्यक्त केला. केवळ 2 टक्के मुलींनी भावी पतीच्या व्यसनाने फरक पडत नसल्याचे सांगितले.


हेच यंग इंडियाचे मत
शालेय जीवनातील विचार आयुष्यभर टिकतात. यामुळे विद्यार्थिनींची मते घेतली. भावनिक पातळीवर पडताळण्यासाठी भावी पतीविषयी प्रश्न विचारले. हे निष्कर्ष गांभीर्याने विचार करायला लावणारे आहेत.
डॉ. दिनेश गुप्ता, समन्वयक, हेल्थ केअर फाउंडेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली