आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाकीची माणुसकी: ब्लॅकमेल होणार्‍या तरुणींना औरंगाबाद ‘सायबर’ने तारले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पोलिस भावनाप्रधान नसतात, असा सर्वसामान्यांचा समज आहे. मात्र, खाकीतही माणूस असल्याचे सायबर सेलच्या पोलिसांनी दाखवून दिले आहे. फेसबुकच्या माध्यमातून फ्रेंडशिपच्या जाळ्यात अडकलेल्या 48 तरुणी व महिलांची पोलिसांनी बदनामी न होऊ देता मुक्तता केली. या कामगिरीमुळे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तीनच गुन्हे दाखल झाले आहेत. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या तरुणींच्या मदतीसाठी पोलिसांनी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे.

एका क्लिकवर असंख्य मित्र मिळवण्याच्या नादात काही तरुणी वैयक्तिक माहिती व छायाचित्रे फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्क साइट्सवर अपलोड करतात. नंतर एखादा मित्र त्यांना ब्लॅकमेल करतो. अशाच काही तक्रारी सायबर क्राइम सेलकडे आल्या. मात्र, बदनामीच्या भीतीने अनेक तरुणी समोर येत नसल्याने ब्लॅकमेल करणार्‍यांची हिंमत वाढत आहे. काही उपद्रवी मित्र तरुणींचे खासगी फोटो फेसबुकवर अपलोड करून त्यांची बदनामी करतात. कधी कधी त्यांचे मोबाइल क्रमांक टाकून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगून त्यांचा मानसिक छळ केल्याचे प्रकारही घडले आहेत.

फेसबुकवर जुने व नवे मित्र मिळवताना काही विकृत वृत्तीचे तरुण आपल्या प्रोफाइलवर खोटी आणि भपकेबाज माहिती टाकून तरुणींना जाळ्यात ओढतात. अनेक तरुणांचे बनावट नावाने फेसबुक अकाउंट आहेत. अशा तरुणांच्या जाळ्यात अडकणार्‍यांत महाविद्यालयीन तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या तरुणींना ब्लॅकमेल केले जात असल्याची अनेक प्रकरणेही पुढे आली आहेत. पोलिस आयुक्तालयातील सायबर क्राइम सेलने 2012 मध्ये केवळ फेसबुकच्या माध्यमातून फसवणूक किंवा मानसिक छळाच्या 11 गुन्ह्यांचा तपास केला. 2013 मध्ये केवळ तीन तक्रारी आल्या. पोलिसांनी या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर सायबर क्राइम कायद्यान्वये कारवाई केली.

मैत्री पडली महागात : फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर एका तरुणीशी जवळीक करण्याचा प्रय} एक तरुणाने केला. मैत्रीच्या काळात काढलेले सर्व फोटो आणि जवळीकतेचे व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी त्याने तिला दिली. मात्र या तरुणीने धाडस करून सायबर सेलकडे तक्रार केली. पोलिसांनी या विकृत मित्राच्या मुसक्या आवळून त्यास चांगलीच अद्दल घडवली.

तक्रार करा. आम्ही मदतीसाठीच
इंटरनेटच्या माध्यमातून तरुणींना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक प्रकरणांत तरुणींना सायबर सेलने मदत केल्याने अनेक तरुणींनी तक्रार करण्याचे धाडस दाखवले. त्यामुळे अनेकांचे संसार वाचवण्यात आम्हाला यश आले.
-गौतम पातारे, पोलिस निरीक्षक

या आहेत पोलिसांच्या टिप्स
>अनोळखी व्यक्तींना फेंड्रलिस्टमध्ये घेऊ नका, वैयक्तिक माहिती व मोबाइल क्रमांक अकाउंटवर टाकू नये
> फोटो अपलोड करू नका,
>चॅटिंगदरम्यान अकाउंट हॅक होणार नाही याची काळजी घ्या.

पोलिसांची हेल्पलाइन : helpher.aurangabd@gmail.com किंवा 91580424444 या क्रंमाकावर एसएमएसद्वारे तक्रार करता येते.