आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: 4 मार्कांनी नापास झाल्याचे कळताच विद्यार्थीनीची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बारावीत एका विषयामध्ये केवळ चार गुणांनी नापास झाल्याने मनीषा भाऊसाहेब गायकवाड (१८, रा. प्रकाशनगर, मुकुंदवाडी) या विद्यार्थिनीने मुकुंदवाडी येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

मनीषाने मनमाड येथे मावशीकडे राहून दोन वर्षे शिक्षण घेतले. चार दिवसांपूर्वीच ती प्रकाशनगर येथे आई-वडिलांकडे राहण्यास आली होती. सकाळी तिने मनमाड येथे राहणाऱ्या मावस बहिणीशी मोबाइलवर संपर्क साधला. ‘तूच निकाल बघ आणि मला सांग’, असे सांगितले. परंतु, काही काळ वेबसाइट ठप्प झाली. मग ती शेजारी राहणाऱ्यांकडे जाऊन बसली. थोड्या वेळाने तिच्या बहिणीने मोबाइलवरून संपर्क साधत ती नापास झाल्याचे सांगितले. हे ऐकताच तिचा चेहरा उतरला. ती शेजारच्यांच्या घरातून बाहेर पडली. घरासमोर तिची आई उभी होती. त्यांनी तिला निकालाचे काय झाले, असे विचारले. मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून ती रेल्वे रुळांच्या दिशेने गेली आणि जालन्याकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेससमोर उडी घेतली. त्यात ती गंभीर जखमी झाली. स्थानिकांनी तिला घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. 

मनीषाचे वडील खासगी कंपनीत कामगार असून तिला लहान भाऊ मोठी बहीण आहे. मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोडे तपास करत आहेत. तिच्या नातेवाइकांच्या माहितीनुसार एका विषयात चार गुण कमी पडल्याने ती नापास झाली होती. तिचे जीवन संपवणारा विषय नेमका कोणता होता, याविषयी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. 
 
हेही वाचा... 
बातम्या आणखी आहेत...