आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्री 10 नंतर वसतिगृहात नाही पाणी प्यायची मुभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुन्हेगार म्हणून तुरुंगात शिक्षा भोगणार्‍यांना तरी रात्री केव्हाही तहान लागली तर प्यायला पाणी मिळते; पण औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात मात्र रात्री 10 वाजेनंतर तहान भागविण्याची मुभा विद्यार्थिनींना नाही. वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोरच ही बाब आज उजेडात आली. पुढच्या 24 तासांच्या आत तिथे 24 तास पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांच्या पुढाकाराने आव्हाड यांचा ‘कॉफी विथ स्टुडंट’ हा कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यात आव्हाड यांनी ‘नायक’ स्टाइलने आदेशांच्या धडाकेबाज फैरी तर झाडल्याच; पण गेली 15 वर्षे आपलेच सरकार सत्तेत आहे हे विसरून येत्या निवडणुकीत निवडून द्या, सर्व सुविधा देतो, असे प्रचारकी आवाहनही त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना केले. कँटीनमध्ये जाऊन पोहे आणि कचोरी खाणे, लेडीज होस्टेलच्या बाथरूमध्ये जाऊन ड्रेनेज तपासणे आणि अधिकार्‍यांना फैलावर घेणे यामुळेही ते विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले. अधिष्ठाता डॉ. एस. के. भोपळे हे या वेळी त्यांच्यासमवेत होते.
जितेंद्र आव्हाड यांनी झाडलेल्या आदेशांच्या फैरी
- महाविद्यालयाच्या परिसरातले उद्यान साफ करून ते तत्काळ खेळण्यासाठी उपलब्ध करून द्या.
- विद्यार्थिनी वसतिगृहाभोवती तत्काळ सुरक्षा भिंत उभी करा.
- 24 तासांत वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची अखंड सोय करा.
- डॉक्टरला मारहाणीचा आरोप असलेल्या मिलिंद दाभाडेंवर उद्याच गुन्हा दाखल करा.
- रिक्त 1600 जागांवर 30 दिवसांत भरती करणार.
- तीन महिन्यांत अभ्यासक्रमात बदल करून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण सुरू करा.
- विद्यार्थ्यांना मोफत ई-लायब्ररी उपलब्ध करून देणार.
- वसतिगृह वातानुकूलित करणार.