आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनी वेळेचे भान ठेवावे, अमृता खानविलकरचा तरुणींना सल्ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय समाजात महिलांवर अत्याचार वाढत आहेत. त्यासोबत पुरुषांवरही अन्याय होत आहे, कारण माणूस माणुसकीला विसरत चालला आहे. संवेदनशीलता संपत आहे. असुरक्षिततेची भावना सर्वांमध्येच प्रबळ होत आहे. म्हणून परस्परांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकानेच प्रयत्न करावेत, असे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अमृता खानविलकरने सांगितले. बदलत्या काळाची पावले मुलींनी ओळखावीत. वेळेचे भान आणि मर्यादा ठेवूनच जीवनाचा आनंद लुटला पाहिजे, असेही मत तिने व्यक्त केले. व्ही. एन. गाडगीळतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी ती शुक्रवारी येथे आली होती. प्रतीक्षा परिचारक यांनी तिच्याशी केलेली बातचित तिच्याच शब्दांत...


स्वातंत्र्य म्हणजे स्वत:ची काळजी घेणे, परंतु आपण स्वातंत्र्याची परिभाषा विसरून स्वैराचाराकडे वळत आहोत. देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र हवे आहे आणि त्याला स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी मुलींनी आता काळजीपूर्वक जगले पाहिजे. कारण काहीजणी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहतो. मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करतो. मात्र, पार्टीनंतर काय होईल याचा विचार करत नाही. आपल्या वागण्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रात्री प्रवास करणे टाळा. शक्यतो रात्र आपल्या कुटुंबासोबतच घालवावा. आयुष्य आनंदाने जगण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे, पण त्यासोबत काही बंधनेही आवश्यक आहेत.

माझी कारकीर्द 2004 मध्ये झी टीव्हीवरील ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या शोद्वारे सुरू झाली. त्यात मी तिसरा क्रमांक पटकावला होता. ई टीव्हीवरील ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या मालिकेचे सुमारे साडेतीनशे भाग केले. त्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव जुलै 2012 पासून पुन्हा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आले आहे. ही मालिका माझ्या कुटुंबाचा एक भाग बनला आहे. नटरंग या चित्रपटातील ‘वाजले की बारा’ या गाण्यामुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली. या गीताने मला नृत्यांगना अशी ओळख मिळवून दिली. सध्या मी ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रिअँलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे. ही जबाबदारी एप्रिलमध्ये संपणार असून त्यानंतर ‘समोरचा जोशा’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. त्यात माझ्यासोबत अभिजीत खंडकेकर प्रमुख भूमिकेत आहे. मला टेंम्पल ज्वेलरी तसेच साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन दागिने घालायला आवडतात. नऊवारी साडीत हे दागिने परिधान केल्यावर मी सुंदर दिसते. सोन्यातील गुंतवणूक सवरेत्तम आहे. हौसेबरोबरच लाभही होतो. त्यामुळे मला दागिन्यांचा मोह आहे.

तांत्रिक बाजू जाणून घेते
चित्रपट स्वीकारताना मी केवळ स्वत:ची भूमिका काय आहे, हेच न पाहता दिग्दर्शक, निर्माता, तांत्रिक बाजू, तंत्रज्ञांचीही माहिती घेते. अनेकदा तांत्रिक बाजू कमकुवत असल्याने चित्रपट प्रदर्शित होत नाही, असा माझा अनुभव आहे. ‘सतरंगी रे’ चित्रपटात आरजे अलिशाची भूमिका साकारण्यासाठी मी रेडिओ जॉकीचे प्रशिक्षण घेतले. हा अनुभव अत्यंत रंजक होता.