आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंगराएवढे दु:ख पचवून बारावीत त्या ‘तिघी’ ठरल्या यशस्विनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- करिअरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे बारावीची परीक्षा. अशा वेळी अचानक घरात घडलेली दु:खद घटना, गंभीर शारीरिक आजार असो की बेताचीच आर्थिक परिस्थिती, या सर्वावर मात करत विद्यार्थिनींनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. निकिता पांडे, सलोनी निराली अन् अाशा नाडे अशी या यशस्विनींची नावे आहेत. 

मजुराच्या मुलीला ९०.३० टक्के 
आर्थिकपरिस्थिती हलाखीची असतानाही स.भु. महाविद्यालयाच्या आशा प्रभाकर नाडे हिने कला शाखेत ९०.३० गुण मिळवले आहेत. आशाची आई धुणीभांडी करते, तर वडील प्रभाकर मजुरी करतात. आशाला दोन भाऊ आहेत. एक भाऊ इंजिनिअरिंगला तर दुसरा बीएस्सी अॅग्री करतो. मला प्रशासकीय सेवेत जायचे आहे, असे अाशा म्हणाली. 

मस्क्युलर अॅट्रॉफी आजारावर मात करून मिळवले ८८ टक्के गुण 
‘मस्क्युलर अॅट्रॉफी’ हा दुर्धर आजार असूनही “मेरे हौंसलों की उडान तो अभी बाकी हैं’ म्हणत सलोनी धनंजय निरालीने बारावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळवले. देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असलेल्या सलोनीला दोन्ही पायांनी चालता येत नाही. ती उठूनही बसू शकत नाही. शारीरिक शक्ती अत्यंत कमी आहे. पण या सर्व परिस्थितीवर मेहनत, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर मात केल्याचे तिची आई शर्मिला निराली यांनी सांगितले. दहावीतही तिला ९३ टक्के गुण होते. माझी सीएची तयारी सुरू असून पुढे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आयएएस व्हायचे आहे. 

बाबांचे स्वप्न मी इंजिनिअर व्हावे 
पेपरच्याकाही तास आधी वडिलांचे निधन झाले होते. अचानक घडलेल्या या घटनेने निकिता पांडे कोलमडून गेली. मात्र वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने परीक्षा दिली अन् ८९ टक्के गुण मिळवले. २० मार्च रोजी माहिती तंत्रज्ञान तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेपर होते. पेपर चांगले सोडव, पेपर कसा गेला असे रोज बाबा विचारायचे. पण अखेरच्या पेपरच्या दिवशी तिचे वडील राजेंद्र पांडे यांचे निधन झाले. त्या प्रसंगातही डगमगता तिने परीक्षा दिली. आज लागलेल्या निकालाने निकिताच्या पंखांना बळ मिळाले आहे. निकिता ही विद्याधाम ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिचे शालेय शिक्षण एसबीओए स्कूलमध्ये झाले आहे. निकिताला एक भाऊ असून, तो आयआयटी पवई येथे शिक्षण घेतो. घरावर दु:खाचा डोंगर कोसळला, पण बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला इंजिनिअर व्हायचे आहे, असे तिने सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...