आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस पीएचडीधारकांची माहिती द्या ; उच्च शिक्षण विभागाचे विद्यापीठाला पत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चंद्रमोहन झा म्हणजेच सीएमजे विद्यापीठाची पीएच.डी. घेणारे प्राध्यापक, संशोधकांची इत्थंभूत माहिती सादर करण्याची सूचना उच्च तंत्रशिक्षण विभागाने केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्याकडे यासंदर्भात पत्र प्राप्त झाले आहे. 4 जून रोजी पत्र मिळाले आणि 4 जूनपर्यंतच माहिती कळवण्याचे पत्रात नमूद असल्याचे बीसीयूडी संचालक डॉ. एस. पी. झांबरे यांनी सांगितले आहे.

सीएमजे विद्यापीठाने बोगस पीएच.डी पदवी वितरित केल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत किमान शंभर ते सव्वाशे संशोधकांनी सीएमजे विद्यापीठाची पदवी संपादन केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानुसार उच्च शिक्षण विभागाने 3 जून रोजीचे एक पत्र विद्यापीठाला पाठवले आहे. हे पत्रच विद्यापीठाला 4 जून रोजी मिळाल्याचे नवनियुक्त बीसीयूडी संचालक डॉ. झांबरे यांनी पत्रकारांना सांगितले. 4 जूनपर्यंत सर्व माहिती पाठवण्याचा पत्रात उल्लेख असून बीसीयूडी संचालक कार्यालयाला हे पत्र 4 जून रोजी सायंकाळी पत्रकारांसमक्ष प्राप्त झाले. आता एवढय़ा कमी वेळेत माहिती कशी द्यायची, असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनाला पडला आहे.


बोगस गाइडशिपची चौकशी पूर्ण
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांनी 18 मार्च 2013 रोजी कुलगुरूंकडे नियमबाह्यपणे 67 जणांना गाइड्शिप दिल्याची तक्रार केली होती. विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अशोक मोहेकर यांच्या दोन सदस्यांच्या समितीमार्फत तक्रारींची चौकशी करण्यात आली आहे. बीसीयूडी संचालक डॉ. झांबरे स्वत: समितीचे दुसरे सदस्य आहेत. त्यांच्या मते समितीने आतापर्यंत 9 बैठका घेतल्या असून जवळपास सर्व काम पूर्ण झाले आहे. लवकरच अहवाल सादर करण्यात येणार आहे. निंबाळकर यांच्या तक्रार गंभीर असून त्यामध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आले आहे. अहवाल सादर केल्यानंतर बोलता येईल, असेही त्यांनी म्हटले.