आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Give Five Thousand Crore Than Taking Credit Gopinath Munde

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रेयासाठी बैठका घेण्यापेक्षा पाच हजार कोटींची मदत द्या - गोपीनाथ मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना काहीही न करता श्रेयासाठी बैठका घेऊन काय होणार? त्यापेक्षा मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत घेऊन 5 हजार कोटींची मदत द्या, अशा शब्दांत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवला. दै.‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत मुंडे यांनी दुष्काळाचे भीषण रूप मार्चनंतर दिसणार असून त्याआधी सरकारने जागे व्हावे, असा इशाराही दिला.

गुरुवारी सायंकाळी एका विवाहासाठी आलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबादेत मुक्काम केला. शुक्रवारी सकाळी त्यांनी खास ‘दिव्य मराठी’शी बातचीत करीत विविध प्रश्नांवर भाष्य केले. दुष्काळावर उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत त्यांनी सरकारला दिल्लीपासून गावपातळीपर्यंत धारेवर धरण्याचा इशारा दिला.

सरकार गंभीर नाही
मुंडे म्हणाले, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात भयंकर दुष्काळाची स्थिती आहे. या काळात दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी गरज आहे ती पैशांची. पण सरकार पैसा देत नाही. दुष्काळ निवारणासाठी जून-जुलैपर्यंत राबवायची कोणतीही योजना सरकारकडे नाही. ऑगस्टमध्ये 125 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले, पण फेब्रुवारीपर्यंत सरकारला निधी मागता आलेला नाही. सरकार गंभीर नसल्याचेच हे द्योतक आहे.
माणुसकीची भूमिका घ्या
सरकारवर हल्लाबोल करताना मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात प्रस्ताव पाठवला, केंद्रीय कृषिमंत्री म्हणतात प्रस्ताव पाठवा. दोघांची ही विधाने म्हणजे दुष्काळात साहाय्य
करण्याऐवजी संभ्रम निर्माण करणारीच आहेत. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रकार आहे. दुष्काळ निवारणासाठी किमान 5 हजार कोटी रुपये हवे आहेत. त्याची काही तरतूद नाही. राजकीयदृष्ट्या निर्णय घेतले जात आहेत. सरकारने माणुसकी आणि समन्वयाची भूमिका घ्यायला हवी.
सुडाचे राजकारण
मुंडे म्हणाले की, सरकारने मोजक्याच तालुक्यांना मदत केली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशाला द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही. पश्चिम महाराष्ट्रा ला 480 कोटी रुपयांची मदत दिली आणि मराठवाड्याला फक्त 10 कोटी रुपये! खरे तर राज्य सरकारने दुष्काळासाठी किमान तीन हजार कोटी रुपये दिले पाहिजेत. शिवाय केंद्राकडूनही साधारण तेवढेच पैसे मिळवण्याची गरज आहे.
नंतर भांडत बसा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या दौ-यावर टीका करताना मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला राष्ट्रवादीला बोलावले नव्हते, पवारांच्या बैठकीला काँग्रेसला आमंत्रण नव्हते. हा बेजबाबदारपणा आहे. तुमच्या भांडणाशी जनतेला देणेघेणे नाही. लोकांना फक्त मदत हवी आहे. काहीही न करता फक्त श्रेयासाठी बैठका घेतल्या जात आहेत. बैठक घ्यायचीच असेल तर औरंगाबादेत तीन दिवसांची मंत्रिमंडळाची बैठक घ्या, तत्काळ निर्णय घ्या. पण त्यांना भांडणातून फुरसत नाही. दुष्काळ संपल्यावर खुशाल भांडत बसा!

जबाबदारी सरकारचीच
चारा छावण्यांची जबाबदारी सरकारचीच आहे, असे सांगत मुंडे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रा त सहकारी संस्था, एनजीओ, कारखाने यांनी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. तसेच मराठवाड्यातही करा, असा सल्ला सरकार देते. पण मराठवाड्यात तेवढ्या श्रीमंत संस्था नाहीत. म्हणून मग गरिबांना काहीच द्यायचे नाही का? हे भयंकर आहे. चारा देणे शक्य नसेल तर शेतक -या ला पैसा तरी द्या. चारा-पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. त्यांना ती टाळता येणार नाही. दिल्लीपासून गावापर्यंत मुंडे म्हणाले की, दुष्काळ हा गावाच्या पातळीवर असल्याने स्थानिक पातळीवर आंदोलने केली जाणार आहेत. मी नुकत्याच दोन दुष्काळ परिषदा घेतल्या. आता 18 तारखेला अंबाजोगाईत परिषद घेतोय. भेटीगाठी, परिषदा असा कार्यक्रम 15 मार्चपर्यंत चालणार आहे. लोकशाही माध्यमातून संसदेत, विधिमंडळात आम्ही आवाज उठवणार आहोत. तरीही सरकार जागे झाले नाही तर व्यापक आंदोलनाशिवाय पर्याय नाही.

सेना-मनसे मनोमिलनाचे प्रयत्न
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासंदर्भात मुंडे म्हणाले की, कोल्हापुरात राज ठाकरे यांनी एकत्र येण्याला नकार दिलेला नाही. वर्तमानपत्रात अशी चर्चा होत नसते, असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेना-मनसे एकत्र यावेत, असे मला आधीही वाटत होते अन् आताही वाटते. त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहे.
राज्यात लक्ष देणार
दिल्लीत रमला नाहीत का, या प्रश्नावर मुंडे म्हणाले की, तसे काही नाही. माझ्याकडे आता महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. ती मी पार पाडणार आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची जबाबदारी मला पार पाडायची आहे. त्यामुळे आता मी राज्यात पूर्ण लक्ष देणार आहे.
मी पेपर फोडत नाही
प्रदेशाध्यक्षपदावरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला थेट उत्तर देणे गोपीनाथ मुंडे यांनी टाळले. मुनगंटीवार, फडणवीस, दानवे यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार, या प्रश्नावर मुंडे म्हणाले की, हे तिघेच नव्हे, तर एकूण दहा-बारा नावे चर्चेत आहेत. पक्षाची कोअर कमिटी त्यावर निर्णय घेईल. आठवडाभरात घोषणा होईल. आताच कुणाचे नाव सांगता येणार नाही. कारण मी ‘आयडियल टीचर’ आहे. त्यामुळे मी पेपर फोडत नाही!