औरंगाबाद - संकटात सापडलेल्या भागात शेतक-यांना कर्जमाफी देण्याची भूमिका शासनाने घेतली पाहिजे. त्यामुळे शेतक-यांची ताकद वाढावी म्हणून मराठवाड्यासाेबतच विदर्भातही त्यांना कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली. उद्योगांना किती रुपये माफ केले जातात, त्या तुलनेत शेतक-यांची कर्जमाफी नगण्य असल्याचेही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आलेले पवार पत्रकारांना म्हणाले, उद्योगांना हजारो कोटी माफी मिळते. एखाद्या उद्योगाचे काही कोटी माफ होतात. शेतक-याला १० हजारही मिळत नाहीत. नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शासनाने खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे.
पाण्यानेच समस्या सुटतील : हवामान खात्याने यंदा ९३ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला. आणखी मे महिन्याच्या मध्यात पुन्हा अंदाज येईल. पण मराठवाड्यात हा पाऊस होईलच याची शाश्वती नाही. इतरत्र अंदाज खरा ठरेल, पण इथे फटका बसू शकतो. सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेने प्रश्न मिटण्याविषयी शंका आहे. पाणीप्रश्न मिटल्याशिवाय मराठवाड्याचे प्रश्न सुटणार नाहीत, असेही पवार म्हणाले.
उसाला ठिबक करा : उसाच्या भावावर पवार म्हणाले, उसाला किमान २७०० ते ३००० रुपये भाव मिळावा. मात्र शेतक-यांनी उसासाठी आता ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. पाटाच्या पाण्यावर एकरभर उस भिजतो. तेथेच ठिबकमुळे तीन एकर भिजू शकतो.
आत्महत्यांत राजकारण नको : शेतक-यांच्या आत्महत्यांवर पवार म्हणाले, हा गंभीर व संवेदनशील मुद्दा आहे. त्याकडे राजकीय दृष्टीने बघायला नको. राज्यात तीन शेतकरी आत्महत्या झाल्याचे राज्याने केंद्राला सांगितले, वस्तुस्थिती लपवायला नको. जे आहे ते प्रशासनाने शासनाला व राज्याने केंद्राला सांगितले पाहिजे.
विदर्भाला जनतेचा पाठिंबा नाही
महाराष्ट्रदिनी राज्यात वेगळ्या विदर्भाचे नारे दिले गेले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीही बोलले नाहीत. यावर पवार म्हणाले, ते विदर्भवादीच आहेत. त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे दोष देता येणार नाही. विदर्भासाठी लढणा-या कोणालाही जनतेचा पाठिंबा नाही. या मुद्द्यावर लढणा-या पक्षाला विदर्भातून चारपेक्षा जास्त जागा विधानसभेत मिळू शकल्या नाहीत.
पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण हा शासनाचा अधिकार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबाबत पवार म्हणाले, तो सर्वस्वी राज्य शासनाचा अधिकार आहे. पुरंदरे हे इतिहासकार नाहीत, याच्याशी मी सहमत नाही. काही वाद असतील; पण त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय हा शासनाचा आहे.
पाण्याला विरोध नाही
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाला प्राधान्य देऊन शासनाने कृती केली पाहिजे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध केला. ते त्यांचे वैयक्तिक मत होते. पक्षाचा कधीही विरोध नव्हता, असेही पवार म्हणाले.
दीड वर्षात मध्यावधी
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर राज्यातील सत्ताधारी शिवसेना व भाजपमध्ये बिनसेल आणि मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असे भाकीत पवार यांनी व्यक्त केले. दीड वर्षांनी ही निवडणूक आहे. युतीचे पटत नाही. हा संसार किती दिवस चालेल, या प्रश्नावर पवार बोलत होते.