आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजूर, मोलकरणींना विम्याचे संरक्षण द्या: उद्योगमंत्री गिते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरात काम करणारा मजूर, कर्मचारी, मोलकरीण कुणीही असेल, त्यांच्या विम्याची जबाबदारी उचला. यामुळे त्यालाही सामाजिक संरक्षण मिळेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी व्यक्त केले आहे. प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेल्या तीन योजनांचा शुभारंभ शनिवारी गिते यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन योजनांचा प्रारंभ संत तुकाराम नाट्यगृहात करण्यात आला. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मनपा आयुक्त प्रकाश महाजन, एसबीआयचे महाव्यवस्थापक दिवाकर मोहंती उपस्थित होते.
सर्वसामान्य लोकांना विम्याचे महत्त्व समजावून सांगा
यावेळी गिते म्हणाले की, सर्वसामान्य लोकांना या योजनेचे महत्त्व समजावून सांगा. आपल्याकडे विमा भरताना चार-पाच वेळेस त्याची रक्कम भरली जाते. मात्र पुन्हा त्यामध्ये दिरंगाई होते. यामुळे त्याचे महत्त्व त्या व्यक्तीला पटवून देण्याची गरज आहे. आज ७० टक्के असंघटित कामगारांना सुरक्षितता नाही. या योजनेच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा मिळणार आहे. आज अनेकांच्या घरात मजूर, कर्मचारी, मोलकरीण अशा व्यक्ती कामाला असतात. या व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. १२ रुपयांचा विमा असेल त्या व्यक्तीला बारा आणि ३३० चा विमा असेल तर ३३० अतिरक्त रक्कम देऊन त्यांना सुरक्षित करण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी बोलताना बागडे म्हणाले की, या तिन्ही योजना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. अटल पेन्शन योजनेचा कामगार तसेच शेतकऱ्यांनी लाभ घेण्याची गरज आहे. विमा सुरक्षेसाठी विशिष्ट रक्कम बँकेत ठेवल्यास त्याच्या व्याजातूनच हप्ता भरला जाईल अशी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे बागडे म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी-कामगारांना सुरक्षा मिळण्यास मदत होईल, असे मत खासदार खैरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र बँकेने काढला ५० हजार लोकांचा विमा
जिल्ह्यातएक लाख लोकांनी विमा काढला आहे. त्यापैकी बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने जवळपास ५० हजार लोकांचा विमा काढण्यात आला असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक राजकिरण भोईर यांनी दिली. एसबीआयच्या वतीने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात ४६ हजार लोकांचा विमा काढण्यात आल्याची माहिती एसबीआयचे मुख्य प्रबंधक समीर त्रैलोक्य यांनी दिली. या वेळी विमा काढल्याबद्दल वीस जणांना सर्टिफिकेट देण्यात आले. सूत्रसंचालन सुनील शिंदे यांनी केले.
लोकसहभाग वाढवा
याकार्यक्रमात लोकांची फारशी संख्या नव्हती. त्यामुळे भाषणाच्या सुरुवातीला गिते यांनी अधिकाऱ्यांना लोकांचा सहभाग वाढवण्याच्या सूचना केल्या. ज्यांच्यासाठी कार्यक्रम आहे त्यांना यामध्ये सहभागी करून घेणे गरजेेचे असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...