आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेतील लाभार्थींसाठी 85 लाखांची गरज होती. याबाबत डीबी स्टारने सातत्याने पाठपुरावा केला. दुसरीकडे विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित झाला. अखेर 31 मेपर्यंत योजनेचा लाभ दिला जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली. शिक्षणमंत्र्यांनी घोषणा केली, मात्र दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी होत आहे.
85 लाखांची गरज : शिक्षण विभागाला दोन वर्षांत विद्यार्थ्यांच्या याबाबत 1 हजार 678 इतकी प्रकरणे दाखल झाली आहेत. यात सर्वाधिक प्रकरणे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या औरंगाबाद जिल्ह्यात 150 प्रकरणे दाखल झाली होती. यात 88 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 62 विद्यार्थी कायमचे जायबंदी झाले आहेत. विद्यार्थ्यांना अनुदानापोटी 1 कोटी रुपयांची गरज असताना केवळ 15 लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
डीबी स्टारचा पाठपुरावा : राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अपघात झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांसाठी मदत दिली जाते. या योजनेचा कसा बट्टय़ाबोळ झाला याविषयी डीबी स्टारने 10 व 11 जानेवारीला दोन वृत प्रकाशित केले होते. यानंतर प्रशासनाने वेगाने हालचाली करीत अखेर अनुदानाच्या रकमेचा धनादेश 8 फेब्रुवारी रोजी चित्रक कुटुंबीयांना दिला. दुसरीकडे आमदार वीरेंद्र जगताप यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर दर्डा यांनी ही घोषणा केली.
तरीही स्वागतच
अनुदानाची रक्कम मार्चअगोदरच मिळायला हवी होती. सध्या जिल्ह्यात दुष्काळ आहे. अनुदानाची रक्कम मेपर्यंत नव्हे, तर एप्रिल महिन्यात देण्याचा प्रयत्न मंत्री दर्डा यांनी करावा. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. उशीर झाला तरी निर्णयाचे स्वागत आहे. अण्णा शिंदे, माजी अध्यक्ष, जि.प.
अमलात आणावी
42 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. आम्ही या विषयी सभागृहात सातत्याने ठराव घेतले आहेत. आता तर मंत्री राजेंद्र दर्डा यांनी पैसे देण्याची घोषणाच केली आहे. योजना तत्काळ अमलात आणावी, अशी आमची इच्छा आहे.विनोद तांबे, गटनेता, जि.प.
अशा योजनांचे अनुदान वाटप करण्यात मुळात उशीरच व्हायला नको. शिक्षणमंत्र्यांनी तोडगा काढला असला तरी तत्काळ अंमलबजावणी व्हावी.
संतोष जाधव, जि.प. सदस्य
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.