आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात मोठय़ा घुमटाचे रहस्य उलगडले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशात सर्वात मोठा दगडाचा घुमट म्हणून मुंबईत बोरिवलीजवळ असलेल्या ग्लोबल पॅगोडाला (घुमट) ओळख मिळाली. 90 मीटर उंच आणि 85 मीटर लांबीच्या या पॅगोडाचे डिझाइन औरंगाबादचे अभियंता न. र वर्मा आणि महेश वर्मा यांनी केले आहे. या पॅगोडाची नोंद लिम्का बुकने घेतली आहे. अशा भव्यदिव्य घुमटाच्या उभारणीची कथा नंददीप बिल्डिंग सेंटरचे संचालक महेश वर्मा यांनी रविवारी औरंगाबादकरांना सांगितली. द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने भानुदासराव चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पारंपरिक पद्धतीने चुना आणि दगडांचा वापर करून ही इमारत उभारण्यात आली आहे. या पॅगोडाला आयआयटी मुंबईकडून नुकतेच भूकंपरोधी असल्याचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून या इमारतीची ओळख करण्यात आली आहे. या घुमटाचा वापर ध्यानधारणा आणि विपश्यनेसाठी करण्यात येतो.

जगातील पहिला प्रयत्न : एकावर एक तीन घुमट असा हा जगातील पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे याबाबत जगभरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण इमारतीसाठी एकाही पिलरचा आधार घेतलेला नाही. ज्याप्रमाणे इजिप्त आणि पुरातन घुमट उभारण्यासाठी इंटरलॉक पद्धतीचा उपयोग करण्यात आला, तसाच येथे दगडांचा वापर करण्यात आला आहे.

अशी आहेत पॅगोडाची वैशिष्ट्ये

0 घुमटाचा व्यास 85 मीटर
0 उंची - 90 मीटर
0 दुसर्‍या घुमटाचा व्यास 64 मीटर
0 उभारण्यासाठी लागलेला काळ 8 वर्षे
0 किंमत - 100 कोटींपेक्षा जास्त
0 या घुमटाला भव्यतेनुसार 24 दरवाजे आहेत
0 एका वेळी यात 10 हजार लोक बसण्याची सोय
0 पुढील 1 हजार वर्षे ही इमारत उभी राहील, अशी शाश्वती आहे.
0 जागतिक विपश्यना केंद्र या इमारतीचे मालक आहे. त्यात झी टीव्हीचे तत्कालीन संचालक सुभाष गोयल आणि सत्यनारायण गोयंका यांचा समावेश आहे.
0 राजस्थान आणि नेवासा येथील चुना आणि दगडांचा वापर करण्यात आला आहे.
0 इमारतीच्या डिझाइनसाठी जागतिक पातळीवर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातून औरंगाबादच्या नंददीप बिल्डिंग सेंटरची निवड करण्यात आली होती.

वास्तूतील विपश्यना समाधान देणारी
जगातील अद्वितीय वास्तू बांधण्याच्या प्रकल्पात मला काम करण्याची संधी मिळाली हे मी भाग्य समजतो. माझ्या डिझाइनपेक्षा त्या ठिकाणची विपश्यना मनाला अधिक समाधान देऊन जाते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी त्याचा अनुभव घ्यायला हवा. - महेश वर्मा, अभियंता