आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटगृहात घेऊन जा पोळीभाजी, पाण्याची बाटली, मनाई केल्यास करा तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चित्रपटगृहात पाण्याची बाटली, खाद्यपदार्थ नेण्यास मनाई केली जाते. कायद्यानुसार प्रेक्षकांना पाणी खाद्यपदार्थ नेता येतात. ही बाब अनेकांना माहितीच नाही. यासाठी १५ ते ३१ डिसेंबरदरम्यान ग्राहक जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. औरंगाबादच्या सर्व चित्रपटगृहांत खाद्यपदार्थ नेण्यास कोणतीही हरकत नसल्याच्या पाट्या लावण्यात येतील, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिली. 


१५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ग्राहक जागरण पंधरवडा साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात देशपांडे यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक पार पडली. या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम, अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डी. सी. शेख, सहायक नियंत्रक वैधमापन व्ही. के. अवनकर यांच्यासह तहसीलदार, ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देशपांडे म्हणाले, चित्रपटगृहात पाण्याची बाटली, घरचे-बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास हरकत घेण्याचे कारण नाही. चित्रपटगृहचालकांचा धंदा चित्रपट दाखवणे आहे. त्यामुळे ग्राहक म्हणून आलेल्या प्रेक्षकांना पाणी, खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करता येणार नाही. बाटलीत अॅसिड नव्हे, पाणी आहे, तर खाद्यपदार्थात बॉम्ब नाही याची खात्री करण्यासाठी तपासणी करू शकता. त्यामुळे तुम्ही पोळीभाजी घेऊन जाऊ शकता. यासाठी विशेष मोहीम राबवून प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर पाण्याची बाटली, खाद्यपदार्थ नेण्याबाबत सूचना फलक लावण्यात येतील. 


कॉलेजचे पार्किंग बेकायदेशीरच
चित्रपटगृहासह शाळा-कॉलेज पार्किंग शुल्क घेतात. पार्किंगची जागा सार्वजनिक वापरासाठी असल्याचे दाखवून एफएसआय घेतलेला असतो. त्यामुळे शुल्क घेणे म्हणजे ग्राहकांची एक प्रकारे लूट असल्याचे देशपांडे म्हणाले. 


ग्राहकांनो, आपल्या हक्कासाठी भांडा 
कायद्यानेग्राहकांना संरक्षण दिलेले आहे. दुकानदार, व्यावसायिक, मॉल, चित्रपटगृहात फसवणूक होत असेल तर ग्राहकांनी त्यांना जाब विचारावा. हक्कासाठी भांडावे. बिल, पावती, लेखी पत्र आदीद्वारे पुरावे जमा करून जिल्हाधिकारी किंवा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे देशपांडे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...