आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी महामंडळाचे 13 सिंचन प्रकल्पांचे उद्दिष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वतीने 2014-15 साठी लघु तसेच साठवण तलाव अशा प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 92 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 31 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या कामाच्या माध्यमातून जवळपास 30 हजार हेक्टर सिंचन निर्मितीचे सिंचन विभागाचे उद्दिष्ट असल्याची माहिती पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक सी. बिराजदार यांनी दिली. दरम्यान, मागील वर्षीच्या नियोजनातल्या 48 पैकी 17 प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने साठवण तलाव, लघु प्रकल्पाचे काम दरवर्षी केले जाते. याअंतर्गत या वर्षी मराठवाड्यात 13 प्रकल्प निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात छोट्या प्रकल्पाच्या निर्मितीतून सिंचन वाढवण्याचा प्रयत्न महामंडळाकडून केला जातो.

30 हजार हेक्टर सिंचन वाढणार : मराठवाड्यात होणा-या या 13 प्रकल्पांच्या माध्यमातून 29629 हेक्टर सिंचन करण्याचे मंडळाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 137 दलघमी पाणी निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी भूसंपादनदेखील करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या कामासाठी 31 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. टप्प्याटप्प्याने 92 कोटी रुपयांचा निधी महामंडळाला या प्रकल्पासाठी मिळणार आहे.

17 प्रकल्प पूर्ण : 2013-14 मध्ये महामंडळाच्या वतीने 48 प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 17 प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित 31 प्रकल्पांची कामे 90 ते 95 टक्के पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पांवर 166 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या माध्यमातून 10346 हेक्टर सिंचन झाले आहे.

13 प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यात कौडगाव येथे लघु पाटबंधारे प्रकल्प, तर बनोटी आणि नांदगाव येथे साठवण तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीची भूसंपादन प्रक्रियादेखील अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधीक्षक अभियंता ग. प्र. वझे यांनी दिली.