आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीही स्वस्त न होणार्‍या सोन्याचा भाव 4 हजारांनी गडगडला!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पंधरा दिवसांपूर्वी तेजीच्या वारूवर स्वार असलेले सोने गेल्या तीन दिवसांत 4 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. जागतिक घडामोडींनी या मौल्यवान धातूचा तेजीचा रथ रोखला. दोन महिन्यांपासून तोळ्यामागे 30 ते 31 हजारांच्या कक्षेत फिरणारे सोने सोमवारी 26,400 रुपयांपर्यंत खाली आले. ही घसरण म्हणजे ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी असल्याचे मत सराफा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केले.
सातत्याने होणारे रुपयाचे अवमूल्यन, कोरियन द्वीपकल्पावर दाटलेले युद्धाचे ढग, युरोपातील आर्थिक संकटाचे गंभीर स्वरूप आणि अमेरिकेची डगमगणारी अर्थव्यवस्था या कारणांमुळे गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानण्यात येणारे सोने तेजी-मंदीच्या हिंदोळ्यावर लटकत आहे. गुरुवारी (दि. 11) सोन्याच्या भावात तोळ्यामागे 500 रुपयांहून अधिक घसरण झाली. त्यामुळे सोने 30 हजारांच्या खाली आले. 22 जुलै 2012 नंतरची ही नीचांकी पातळी होती. शुक्रवारी (दि.12) ते पुन्हा 900 रुपयांनी घसरले. शनिवारी सोन्याच्या भावात एका दिवसात 1250 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ते 29000 हजारांखाली आले. सोमवारी भावात तोळ्यामागे 1500 रुपयांची घसरण झाली व सोने 26,400 रुपये प्रतितोळा झाले. ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोने तीन हजारांनी स्वस्त झाल्याने अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. सोने खरेदीची ही सुवर्णसंधी ग्राहकांनी साधावी, असे मत बहुतेक सराफा व्यापार्‍यांनी व्यक्त केले.

खरेदीस हरकत नाही
सोने आणखी कमी होईल, मग ते आता खरेदी करावे की वाट पाहावी अशी द्विधा अवस्था अनेक ग्राहकांची आहे. मात्र, सध्याची स्थिती गुंतवणुकीसाठी योग्य आहे. कारण, बॉटम प्राइसचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. सोने खरेदीची ही सुवर्णसंधी ग्राहकांनी सोडू नये उदय सोनी, संचालक, लालचंद मंगलदास सोनी

टप्प्याटप्प्याने खरेदी करा
ग्राहकांनी सोने खरेदीची आयती संधी सोडू नये. प्रत्येक खालच्या पातळीवर आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने खरेदी करावी. आंतरराष्ट्रीय प्रभावाने ही तेजी-मंदी होत असते. मात्र, ग्राहकांनी स्वस्त झालेले सोने खरेदी करावे . दत्ता सावंत, उपाध्यक्ष, राज्य सराफ फेडरेशन

ग्राहकी वाढली
स्वस्त झालेले सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. युरोपातील केंद्रीय बँकने सोने विकायला काढल्याच्या वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने गडगडले. त्याचाच परिणाम भारतात दिसून येत आहे. युरोपातील बँकेचे सोने खरेदी करण्यासाठी जागतिक पातळीवर एखादा ग्राहक किंवा बँक तयार झाल्यास सोने पुन्हा तेजीत येण्याची शक्यता आहे. सचिन घाणेकर, व्यवस्थापक, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स

‘बाय ऑन डिप’ नुसार खरेदी
उत्तर कोरियाकडून मिळणारे युद्धसंकेत, सायप्रसने सोने विक्रीचा व्यक्त केलेला मनोदय या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तसेच चांदीच्या किमती मोठय़ा प्रमाणात घसरल्या. अशा स्वरूपाची घसरण तात्पुरती असते. गुंतवणूकदारांनी ‘बाय ऑन डिप’ या सूत्रानुसार आपल्या कुवतीनुसार खरेदी करावी. काही काळानंतर कया तेलाच्या किमती वाढतील. त्यानंतर सोन्या-चांदीत तेजीचे संकेत आहेत.’’
विश्वनाथ बोदाडे, वरिष्ठ व्यवस्थापक, आनंद राठी शेअर्स ब्रोकर्स