आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोने चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, चार आरोपींना गुन्हे शाखेने वर्णनावरून पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विविध जिल्ह्यांतील सोन्याच्या दुकानांत सराफांना बोलण्यात गुंतवून हातसफाईने सोने चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी शुक्रवारी (१९ सप्टेंबर) मुसक्या आवळल्या. यात तीन महिलांसह चौघे आरोपी असून त्यांच्या विरोधात वाशीम पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेने चारही आरोपींना वाशीम पोलिसांच्या स्वाधीन केले.

वाशीम शहरात काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या दुकानात चोरी केल्याच्या आरोपावरून शहर पोलिस ठाण्यात (भादंवि-३८०) गुन्हा दाखल आहे. सोने घेण्याचा बनाव करून सराफांना बोलण्यात गुंतवत अत्यंत शिताफीने ही टोळी सोने चोरायची. ही टोळी औरंगाबादेत आल्याची माहिती वाशीम पोलिसांना होती.

शहरातील गुन्हे शाखा पोलिसांना ही माहिती देऊन वाशीम पोलिसांनी फोनवरून दोन महिलांचे वर्णन सांगितले. या वर्णनाच्या आधारे आणि सीडीआरच्या मदतीने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुकुंदवाडी परिसरात सापळा रचला. सहायक पोलिस आयुक्त बाबाराव मुसळे यांनी सर्व माहिती सहायक पोलिस निरीक्षक उन्मेश थिटे यांना दिली.

शिवाय त्यांचे पथक टोळीच्या शोधासाठी रवाना केले. ही टोळी मुकुंदवाडी परिसरात एका चारचाकी वाहनातून फिरत असल्याची माहितीही थिटे यांनी संकलित करून ठेवली होती. मिळालेल्या वर्णनावरून थिटे यांनी चौघांच्या टोळीला पकडले. सिंधुदुर्ग, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांसह महाराष्ट्रभर या टोळीने सराफा दुकानांना लक्ष्य केले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गुन्हे शाखा पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर वाशीम पोलिस तेथे पोहोचले. वाशीम पोलिस अधिक तपास करत असल्यामुळे आरोपींना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह, पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त मुसळे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात थिटे, सहायक फौजदार नसीम खान, एस.पी. मोरे, विजयानंद गवळी, धीरज काबलिये, विशाल सोनवणे, प्रदीप शिंदे, रवींद्र दाभाडे, संदीप क्षीरसागर आदींनी ही कारवाई केली.
आरोपींनी सांगितला बीड जिल्ह्याचा पत्ता
बीडच्यागेवराई तालुक्यातील संजयनगर येथे राहणाऱ्या शीतल सदाशिव पवार (२५), कावेरी अजित पांडे (३०), शकुनबाई भुराजी शिंदे (३५) यांच्यासह गेवराई तालुक्यातीलच लोहारगल्ली येथील नितीन भास्करराव पोपाळघट या चौघांनाही गुन्हे शाखेने पकडले. चौघेही एसयूव्ही कारमध्ये फिरत होते, ती कारही पोलिसांनी हस्तगत केली आहे.