आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती दुप्पट होणार, व्यवस्थापन परिषदेच्या 23 रोजी बैठकीत शिक्कामोर्तब होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गुणवंतांना दिल्या जाणाऱ्या सुवर्णमहोत्सवी फेलोशिपच्या रकमेत दुपटीने वाढ होणार आहे. यासाठी पूर्वी ५० लाखांची अर्थसंकल्पीय तरतूद होती, आता मात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढवून ती एक कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अर्थसंकल्पावर चर्चेसाठी रविवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक विभागातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जात असे. त्यासाठी विद्यापीठाच्या दरवर्षीच्या अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद केली जात होती. त्यात ५० लाख वाढीची शिफारस व्यवस्थापन परिषदेने केली आहे. १ कोटी रुपयांची तरतूद झाल्यास प्रत्येक विभागाचे चार विद्यार्थी फेलोशिपसाठी पात्र ठरतील. मात्र, यासंदर्भातील अंतिम निर्णय २३ फेब्रुवारीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत होईल. परीक्षा नियंत्रकाची निवडीसाठी दोन सदस्यांची पॅनलवर निवड करण्यात आली. डॉ. शिवाजी मदन आणि डॉ. दत्तात्रय आघाव यांचा पॅनलमध्ये समावेश आहे. कंत्राटी कामगारांना कायम करून त्यांचे वेतन विद्यापीठ फंडातून देण्यासंदर्भात चर्चा झाली. बैठकीला संजय निंबाळकर, डॉ. शिवाजी मदन, डॉ. गणेश शेटकार, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. गीता पाटील आदी सदस्य हजर होते.

खर्च कमी करण्याची सूचना : शैक्षणिक सत्र २०१५-१६ साठी २२५ कोटींचाअर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. त्यापैकी विद्यापीठ उत्पन्नाचा वाटा ८० कोटी आहे. उर्वरित १४५ कोटींची रक्कम विद्यापीठाला शासन देते. उत्पन्न ८० लाखांचे, खर्च मात्र ११७ कोटींचा असून खर्चाच्या तुलनेत ३७ कोटी रुपयांची तूट आहे. ही तूट ४० टक्के एवढी असून तूट कमी करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने सूचना केल्या आहेत.

शेतकरी-शेतमजुरांच्या पाल्यांना विद्यापीठाचा आधार
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पीएचडी संशोधन आर्थिक विवंचनेमुळे राहू नये म्हणून शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांना पीएचडी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. त्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली असून गरीब मुलांचे संशोधन आता आर्थिक अडचणीमुळे रखडणार नाही याची विद्यापीठ स्तरावरून काळजी घेतली जाईल, असे सांगण्यात आले आहे.