आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Good News For Satara Deolai Resident People In Aurangabad

औरंगाबाद येथील सातार्‍यातील 2 वर्षे जुन्या रहिवाशांवर कारवाई नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अतिरिक्त, अवैध बांधकाम असले तरी अशा अपार्टमेंट्समध्ये मागील दोन वर्षांपासून राहत असलेल्या सातारा व देवळाई परिसरातील नागरिकांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खुशखबर आहे. नोटीस मिळाली असली तरी लोकांनी कोणतीही भीती बाळगू नये, निश्चिंत राहावे. त्यांच्या इमारतीवर कोणतीही कारवाई होणार नाही, अशा शब्दांत सातारा-देवळाई नगर परिषदेचे प्रशासक विजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. काही बिल्डरांनी केलेल्या चलाखीमुळे नगर परिषदेचे कर्मचारी संभ्रमात पडले आणि त्यांनी सरसकट नोटिसा वितरण करण्याचे सत्र चालवले होते, असे सांगून सध्या अतिरिक्त बांधकाम सुरू असेल त्या इमारतींवरील कारवाई मात्र सुरूच राहणार आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

कष्टाच्या कमाईतून अनेकांनी सातारा-देवळाई भागात सदनिका घेतल्या. बिल्डरांनीही त्यांना ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी असल्याचे सांगितले होते. शिवाय काही वित्तीय संस्थांनी गृहकर्जेही देऊ केली होती. त्यामुळे काही वर्षांतच हा परिसर इमारतींनी भरून गेला होता. महिनाभरापूर्वी प्रशासनाने अतिरिक्त, अवैध बांधकामाविरुद्ध कारवाईची मोहीम उघडली. लोक राहण्यास आलेल्या अपार्टमेंट्सना यातून वगळण्यात आल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. परंतु प्रत्यक्षात गेल्या आठ दिवसांत सुमारे ५० रहिवासी अपार्टमेंट्सना नोटिसा आल्या. यातील २० ते ३० इमारतींत लोक राहत होते. सात दिवसांत अवैध बांधकाम काढून घेण्याचे त्यात नमूद होते. यामुळे नागरिकांचे धाबे दणाणले होते. अनेकांनी स्थगिती आणण्यासाठी न्यायालयातही धाव घेतली. काँग्रेसने ३ जानेवारी रोजी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्याचेही जाहीर केले. सातारा परिसराची लोकसंख्या सुमारे ४५ हजारांच्या घरात आहे.

गॅलरीत कपडे वाळत घातले, दारांत भांडी!
रहिवासी अपार्टमेंट्सवर कारवाई करणार नसल्याचे आम्ही जाहीर केले होते. त्यामुळे बिल्डरांनी खोडसाळपणा केला. बांधकाम पूर्ण होत आलेल्या इमारतींत त्यांनी गॅलरीत कपडे वाळत घातले, घरांना वेगवेगळी कुलपे लावली, दारांसमोर भांडी ठेवली होती. यामुळे नोटीसी देण्यास गेलेल्यांना येथे लोक राहत असल्याचे वाटले. म्हणून मग आम्ही सरसकट नोटिसा बजावणे सुरू केले, असे राऊत यांनी दै. "दिव्य मराठी"शी बोलताना स्पष्ट केले.

सर्वांना नोटिसा वाटल्या, खुलासा द्यावा लागणार
प्रशासनाचे कर्मचारी, अधिकारी नोटिसा देताना जागेवर पाहणी करतात. अतिरिक्त बांधकाम, एक एफएसआयपेक्षा जास्त बांधकाम असे निकष तपासून ते नोटिसा देत होते. त्यामुळे काही बिल्डरांनी रहिवासी राहत असल्याचे भासवले. संभ्रमात सापडलेल्या कर्मचार्‍यांनी सर्वांना नोटिसा देण्याचा सपाटा लावला. अर्थात या कृतीचे समर्थन करता येणार नाही. त्यांच्याकडे याचा खुलासा मागणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

निश्चिंत राहा, राहते घर सोडावे लागणार नाही
सातारा, देवळाई परिसरात दोन वर्षांपासून घरे घेऊन राहणार्‍यांनी कोणतीही चिंता करू नये. त्यांनी अगदी निश्चिंत राहावे. राहते घर सोडण्याची गरज त्यांना पडणार नाही. - विजय राऊत, प्रशासक, सातारा-देवळाई नगर परिषद