आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Good Relations Between Shiv Sena And BJP Decide To Set Up Committee

शिवसेना-भाजपमधील तणाव निवळण्यासाठी समितीची होणार स्थापना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंधरा वर्षांच्या खंडानंतर सत्तेत आलेल्या भाजप आणि शिवसेना या पक्षांत पहिल्या दिवसापासूनच ताणतणाव आहे. कोणी कोणाला कमी लेखतो, कोणी कोणावरही आरोप करतो, कोणी डरकाळी फोडतो. एकत्र नांदत असताना असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून या दोन्ही पक्षांतील समजूतदार नेत्यांची एक संयुक्त समिती गठित करण्याच्या हालचाली मुंबईत सुरू झाल्या आहेत. काही वाद असेल तर तो बंद दाराआड सोडवला जावा. त्याची बाह्य वाच्यता होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी ही समिती काम करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याची सुरुवात मावळत्या आठवड्यात झाली असून एकदा भाजप प्रदेश कार्यालयात, तर दुस-यांदा शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या शिवालयात प्राथमिक बैठका झाल्या आहेत. सेना नेते अनिल देसाई, सुभाष देसाई, तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या बैठकांना उपस्थित होते. आधी बैठक भाजप कार्यालयात झाली. मात्र सेनेला कमीपणा वाटू नये म्हणून शुक्रवारी दानवे यांनी शिवालयात जाऊन याच नेत्यांना पुन्हा भेटून चर्चा पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.
पुढील आठवड्यात या समितीच्या घोषणेबरोबरच समन्वय साधण्याची जबाबदारी कोणावर असेल हे जाहीर केले जाणार असल्याचे सूत्रांनी म्हटले असून भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनीही यास दुजोरा दिला आहे. या समितीत दोन्हीही पक्षांचे प्रत्येकी चार ते पाच जण असणार असून संयमी नेत्यांना यात स्थान दिले जाईल, असे समजते. सत्तेत एकत्र असताना विरोधकांसारखे आरोप करणे योग्य नसल्यामुळे या समितीचा प्रस्ताव समोर आला आहे. प्रसारमाध्यम आणि सर्वसामान्यांमध्ये प्रतिमा जपण्यासाठी समितीचा हा वेगळा प्रयोग ठरणार आहे.

पदाधिका-यांतील वाद वेळीच मिटणार
सेनेला सत्तेत घेण्यावरून भाजपमध्ये मतभेद होते, तर सत्तेत न घेतल्यामुळे शिवसेना संतप्त होती. त्यामुळे सत्तेत दाखल होईपर्यंत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. नंतर ते सत्तेत आल्याने यात काहीही फरक पडला नाही. एकाने आरोप केला, तर दुसरा लगेच प्रत्युत्तर देतो. यात भाजपकडून एकनाथ खडसे, तर सेनेकडून रामदास कदम व संजय राऊत आघाडीवर आहेत. त्यातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका भाषणात वाघाची डरकाळी फोडली. एकत्र नांदत असताना असे वाद जाहीरपणे नकोत, अशी भूमिका दोन्ही पक्षांतील ज्येष्ठांची आहे. त्यामुळे समन्वय समिती नेमून काही वाद असतील तर ते वेळीच समन्वयासाठी या समितीची गरज दोन्हीही पक्षांना भासल्याचे सांगण्यात आले. राज्यात शिवसेना कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिली आहे. या वेळी त्यांना दुस-या क्रमांकाच्या भावाची भूमिका पचनी पडल्याचे दिसत नाही. सेनेला बरोबर घेणे ही भाजपची गरज असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी ही समिती असेल.