आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde Death Anniversary Program In Aurangbad

मोदीदेखील बाबांना डावलू शकले नाहीत : पंकजा मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बाबांचा फोन आला. कदाचित मला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही. मंत्रिमंडळ निश्चितीचा कार्यक्रम संपला की आपण परत जाऊ, असे ते म्हणाले. पण बाबांना मंत्रिपद मिळणार नाही ही बातमी पसरताच महाराष्ट्रात सुतकी वातावरण निर्माण झाले. त्याची दखल घेऊन मोदींनाही त्यांचा निर्णय बदलावा लागला. मोदींनाही गोपीनाथ मुंडे यांना डावलणे शक्य झाले नाही, अशा शब्दांत मुंडे यांच्या कन्या व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आठवणींना उजाळा दिला.

मुंडे यांच्या स्मृती सप्ताहानिमित्त बुधवारी "जागर आठवणींचा' हा मुलाखतवजा कार्यक्रम झाला. त्यात पंकजा बोलत होत्या. या वेळी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भटक्या विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकुजी इदाते यांनीही मुंडेंच्या आठवणी जागवल्या. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या ‘पक्षात मुंडेंना त्रास होता का?’ या प्रश्नावर पंकजा म्हणाल्या, मंत्रिमंडळात समावेशाबद्दल बाबाही साशंक होते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात परतायचे ठरवले होते. कदाचित मोदींना दुसऱ्या दिवशी त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करायचे असेल. मुंडे म्हणजे काय या प्रश्नावर सर्वांनीच मंुडे म्हणजेच संयम आणि संघर्ष असे उत्तर दिले.

मोदींवर टिप्पणी करायची नव्हती
दरम्यान, रात्री उशिरा पंकजा यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. मुंडे यांना टाळणे मोदींनाही शक्य झाले नाही, असा माझ्या बोलण्याचा थेट अर्थ नव्हता. मोदींविषयी मला कोणतीही टिप्पणी करायची नव्हती, असे पंकजा यांनी सांगितले.

संघाने मुंडेंना कधीच विरोध केला नाही : इदाते
भिकुजी इदाते म्हणाले, रा.स्व. संघाने मुंडेंना कधीच विरोध केला नाही. केंद्रातील मंत्रिपदाच्या वेळी संघाचा विरोध असल्याचे पसरवले गेले. मात्र तसे काहीच नव्हते. तेव्हा त्यांना उसनवारीवर घ्यायचे व नंतर मुख्यमंत्री करायचे अशी चर्चा होती. ते खऱ्या अर्थाने संघाच्या मुशीत तयार झाले होते. मुंडेंनंतर भाजप नेते पवारांच्या घरी जातात काय, या प्रश्नाला मात्र इदाते यांनी बगल दिली.

जेपींना स्टेशनवर डी.लिट. देणारे मुंडेच : जावडेकर
जावडेकर म्हणाले, जयप्रकाश नारायण यांना डी. लिट. देण्यास पुणे विद्यापीठाने नकार दिला. पुढे मुंडे यांच्या नेतृत्वाखाली १० हजार विद्यार्थ्यांनी त्यांना रेल्वेस्टेशनवर पदवी दिली. तेव्हाच त्यांच्यातील नेतृत्वाची चुणूक दिसली होती. पक्षात मुंडेंवर झालेल्या कथित अन्यायाबाबतच्या प्रश्नावर मात्र जावडेकरांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले.

मुंडेंना पक्षात त्रास हाेता : पाटील
हर्षवर्धन पाटील म्हणाले, मुंडेंमुळेच आज मुंबई शांत आहे. त्यांच्यासारखा गृहमंत्री आजही मिळालेला नाही. हेलिकाॅप्टरने आम्ही प्रवास करत होतो. पायलटला काहीच दिसत नव्हते. मला घाम फुटला, पण मुंडेंच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. पक्षात खूप त्रास होता, पण मुंडे यांनी नेहमी संयम बाळगला.