आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडे म्हणतात, ‘आता माझी लढाई सुरू’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी, चारा छावण्यांची थकबाकी त्वरित अदा करावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारपासून (8 एप्रिल) विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला. आपल्या आयुष्यातील हे पहिलेच उपोषण असल्याचे सांगत त्यांनी हे उपोषण म्हणजे माझ्या लढाईचा प्रारंभ असल्याचे नमूद केले. शासनाचा प्रतिनिधी आल्याशिवाय आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, मंगळवारी (9 एप्रिल) भाजपच्या वतीने मराठवाड्यात चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

मुंडे यांनी चारा छावण्या आणि दुष्काळाच्या प्रश्नावर उपोषण करण्याचा इशारा गेल्या आठवड्यात दिला होता. त्यानुसार आज त्यांच्या आंदोलनाला प्रारंभ झाला. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील भाजपचे लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. उपोषणच्या ठिकाणी बोलताना मुंडे म्हणाले की, आजचे हे पहिलेच उपोषण असून ते शेवटचेही ठरू शकते. पण आपण माघार घेणार नाही. एक एप्रिलला उपोषणाचा इशारा दिला होता. या कालावधीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह शासनाच्या एकाही प्रतिनिधीने आपल्यासोबत चर्चा केली नाही, त्यामुळेच उपोषणाची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. हा दुष्काळ 1972 पेक्षा भीषण असूनही शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. चारा, पाणी, हाताला काम हे प्रश्न सोडवण्यास शासन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.
महिलांचा सहभाग : मुंडे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले पाचशेहून अधिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. सुभेदारीचे मागील गेट ते विभागीय आयुक्तालयासमोरचा रस्ता असा अवाढव्य मंडप टाकण्यात आला. उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून जनरेटर लावून पंखे, कूलरची सोय करण्यात आली होती. मंडपात जागोजागी सरकारविरोधी घोषणा लिहिलेले फलक लावण्यात आले होते. मराठवाड्याच्या विविध भागांतून आलेल्या नेत्यांची भाषणे सुरू असताना उपस्थितांमधून ‘आघाडी सरकारचा निषेध असो,’ अशा घोषणा वारंवार दिल्या जात होत्या.
यांनी दिला आंंदोलनाला पाठिंबा : मुंडे उपोषणाला बसल्याचे कळताच खासदार चंद्रकांत खैरे, राजू वैद्य, त्र्यंबक तुपे, गोपाळ कुलकर्णी, छावाचे प्रा. चंद्रकांत भराट, उद्योजक राम भोगले, उल्हास गवळी, प्रा. शरद अदवंत, अ‍ॅड. प्रदीप देशमुख, मुर्डेश्वरचे काशीगिरी महाराज यांच्यासह अनेकांनी उपोषणाला पाठिंबा दिला.
पतंगरावांचा फोन : मुंडेंना वन, पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांचा फोन आला. मुंडे यांनी त्यांना
आपल्या मागण्या सांगितल्यावर हे धोरणात्मक विषय असल्याचे सांगत पतंगरावांनी आश्वासन देणे टाळले. त्यानंतर सरकारच्या पातळीवर फारशा हालचाली झाल्या नाहीत.
मुंडे यांच्या मागण्या, सूचना
दुष्काळासाठी पाच हजार कोटी रुपये द्या
पाण्याअभावी मरण पावलेल्या, आत्महत्या केलेल्या 150 जणांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत द्या
संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा
चारा छावण्या, टँकर, अधिग्रहित विहिरीची थकबाकी द्या
रोहयो, मनरेगाचीच कामे सुरू ठेवा
जायकवाडीत नऊ टीएमसी पाणी सोडा
शिरपूर पॅटर्न धोरण म्हणून राबवा
सिमेंटचे बंधारे जागोजागी बांधा
पैसेवारीची अट न ठेवता मराठवाड्यात सर्वत्र टँकर सुरू करा
परळीच्या थर्मल पॉवरला पाणी देण्याची उपाययोजना करा