आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेंचे पीए नायर यांची नार्को चाचणी करा; श्रद्धांजली सभेत समर्थकांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकनेते तथा केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू संशयकल्लोळ निर्माण करणारा आहे. अपघाताच्या वेळी त्यांचे खासगी सचिव सुरेंद्र नायर सोबत होते. त्यामुळे अपघाताच्या सीबीआय चौकशीसह नायरचीही ‘नार्काे टेस्ट’ करावी, अशी मागणी मुंडेंच्या चाहत्यांनी शनिवारी येथे केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. 3 जूनला मुंडे यांच्या झालेल्या अपघाती मृत्यूने अवघा महाराष्ट्र हळहळला. अंत्यसंस्कार होऊन चार दिवस उलटले तरीही जनतेचा आक्रोश थांबलेला नाही. श्रद्धांजली सभेत खासदार चंद्रकांत खैरे यांनी मनोगत मांडताना हा विषय छेडला. ‘मुंडे यांच्या निधनाचे सर्वांनाच दु:ख आहे, पण भाजप नेत्यांवर कृपया संशय घेऊ नका’, असे आवाहन खैरे यांनी करताच गोंधळ उडाला.

उद्धव ठाकरे यांनी मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी पूर्वीच केली असल्याने खैरे यांच्या या विधानामुळे गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाला. ‘सीबीआय चौकशी झालीच पाहिजे’ अशा घोषणा सभागृहात सुरू झाल्यावर आपण सोमवारी संसदेत ही मागणी करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

फडणवीस यांनी शेवटी मनोगत मांडले. सर्व जण सभागृहाच्या बाहेर पडताना काही जणांनी प्रवेशद्वाराजवळ प्रदेशाध्यक्षांना घेराव घातला. सत्य बाहेर येण्यासाठी अशी टेस्ट गरजेची असल्याचा आग्रह सर्मथकांनी धरला. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने यासंदर्भात सुरेंद्र नायर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या मित्राने उचलला, नायर यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

(फोटो : श्रद्धांजली सभेत डावीकडून मधुकरअण्णा मुळे, मोरेश्वर सावे, केशवराव औताडे, माधव जानकर, अनिल भालेराव, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, जयसिंगराव गायकवाड, चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, कला ओझा आदी छाया : मनोज पराती)