आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेंविरोधात पवारांना बीडमध्ये उमेदवार मिळेना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना बीड जिल्ह्यातच अडकवून ठेवण्याच्या वल्गना करणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांना अजूनही त्यांच्याविरोधात बीड मतदारसंघातून उमेदवार निश्चित करता आलेला नाही. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर की राज्यमंत्री सुरेश धस यांच्या नावावरच पक्षर्शेष्ठींचा गोंधळ उडत असल्याने राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत बीडचा उमेदवार जाहीर होऊ शकलेला नाही.

राष्ट्रवादीने 18 उमेदवारांची यादी जाहीर केली, तर बीड, हिंगोली, हातकणंगले व मावळचे उमेदवार मात्र जाहीर केले नाहीत. हिंगोलीची जागा राजीव सातव यांच्यासाठी कॉँग्रेसने मागितली आहे, त्या बदल्यात सुनील तटकरेंसाठी रायगडची जागा घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ ताब्यात असलेल्या बीडमध्ये मात्र कोणाला उमेदवारी द्यावी? याचा गुंता सोडवण्यात शरद पवारांना यश आलेले नाही. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर व राज्यमंत्री सुरेश धस यांच्या नावांवर खल सुरूच आहे.
मला नको, ‘त्यांनाच’ द्या..!

इतर मतदारसंघांत उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा असते, बीडमध्ये मात्र ‘मला नको, दुसर्‍याला उमेदवारी द्या’ अशी ‘उदार’ भूमिका सर्वच नेत्यांनी घेतलेली दिसते. संपूर्ण जिल्हय़ात तगडा जनसंपर्क असलेल्या क्षीरसागर यांनाच रिंगणात उतरवावे, असा सर्वच मराठा नेत्यांचा आग्रह आहे, तर याच स्वपक्षीय नेत्यांवर विश्वास नसल्याने क्षीरसागर मात्र उमेदवारीस उत्सुक नाहीत. पक्षर्शेष्ठींनी आदेश दिले तरी ते मान्य करण्याच्या मन:स्थितीत क्षीरसागर नाहीत. शेवटपर्यंत क्षीरसागरांचे मन वळवण्यात अपयश आल्यास अखेर धस यांनाच रिंगणात उतरविण्याचा पक्षाचा ‘बी प्लॅन’ आहे. अखेरच्या टप्प्यात त्यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते, असे पक्षाच्या गोटातून कळते. मावळ व हातकणंगलेतही राष्ट्रवादीचे उमेदवारही जाहीर झालेले नाहीत. हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात पक्षाकडे तगडा उमेदवार नाही, त्यामुळे ही जागा कॉँग्रेसकडे ढकलून त्याऐवजी एखादी फायद्याची जागा पदरात पाडून घेण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघाचा उमेदवारही पक्षाने जाहीर केलेला नाही. खरे तर येथील शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्याची घोषणा यापूर्वीच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात केली होती. मात्र तरीही पहिल्या यादीत त्यांचे नाव न जाहीर झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.