औरंगाबाद - करोडो लोकांच्या मनाला चटका लावून जाणारे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा आंबेडकरी अनुयायांविषयी स्वच्छ आणि प्रामाणिक प्रयत्न असायचा. परळीतील नाथ्रा त्यांची जन्मभूमी असली तरी ख-या अर्थाने औरंगाबाद कर्मभूमी होती. नामांतर असो की खैरलांजी प्रकरण, त्यांनी नेहमी आंबेडकरी अनुयायांचा कैवार घेतला. वेळप्रसंगी ते पक्षाच्या विरोधात जाऊन या समाजाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले.
पीईएसला आर्थिक बळ
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने राज्यात सत्तापालट झाला. युतीची सत्ता आली. गोपीनाथरावांकडे उपमुख्यमंत्रिपद गृहमंत्री असे महत्त्वाचे खाते होते. त्यांनी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी 1995 मध्ये साडेतीन कोटींचा निधी दिला. एवढेच नाही तर त्या निधीचा वापर योग्य पद्धतीने होतो की नाही यासाठी समिती गठित केली. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मिलिंद महाविद्यालयाचे स्टेडियम या निधीतूनच उभे राहिले. त्या वेळी नागसेनवनाच्या पटांगणात त्यांचा भव्य नागरी सत्कारही झाला.
अविनाश साळवेचा खून
युतीचे सरकार असताना शिवसेनेच्या नगरसेवकाने माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे यांचा नातेवाईक अविनाश साळवे याचा खून केला. त्या वेळी शिवसेनेच्या विरोधात दलित समाज संतापून उठला होता. साळवेच्या अंत्ययात्रेदरम्यान जमावाने प्रचंड दगडफेक आणि जाळपोळ केली. अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले. प्रकरणातील सरकारी वकील बदला, अशी मागणी समाजाने केली. मुंडे स्वत: क्रांतिनगरात आले. त्यांनी द्वारसभा घेतली आणि सरकारी वकील बदलून दिला. परिणामी मारेक-याला जन्मठेप झाली.
पुढे वाचा...