आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde News In Marathi, BJP, Pankaja Palve Munde, Divya Marathi

गोपीनाथरावांचा वारसा पंकजांकडे द्या, चंद्रकांत खैरे यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंकजा पालवे-मुंडे यांच्याकडे गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सोपवा, अशी मागणी शनिवारी श्रद्धांजली सभेत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. टाळ्यांच्या कडकडाटात ही मागणी उचलून धरत उपस्थितांनी पंकजांच्या नावाचा जयघोष केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने बोलते करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हा निर्णय जलदान विधीनंतर घेण्यात येईल, असे जाहीर केले.

माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बीड येथे पत्रकार परिषद घेऊन पंकजांना केंद्रीय ग्रामविकासमंत्री करण्याची मागणी केली. मुंडे यांचा राजकीय वारसा चालवण्याची पंकजांमध्ये क्षमता असून त्यांनाच पुढे करण्याचा जनतेचा रेटा आहे. त्यामुळे यासंदर्भात पक्षाचा निर्णय कधी होण्याची अपेक्षा आहे, असा सवाल फडणवीस यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, ‘सध्या संपूर्ण पक्ष आणि आम्ही कार्यकर्ते शोकमग्न आहोत. मुंडे कुटुंबीयांवर, मराठवाड्यावर मोठा आघात झालेला आहे. त्यामुळे सध्या तरी आम्ही राजकीय बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पक्षनेते आपसात चर्चा करून ठरवतील,’ असे त्यांनी म्हटले. मात्र पंकजांचा विचार होईल का, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी होकारार्थी मान डोलवून दिले. तत्पूर्वी त्यांनी मुंडे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यातील सर्वात ताजी आठवण त्यांनी (31 मे 2014) मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या स्वत:च्या भाषणाची करून दिली. पदवीधरचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर फडणवीस म्हणाले होते, ‘मुंडेसाहेबांना आम्ही फक्त तीन महिन्यांसाठी दिल्लीला उसने देत आहोत. त्यानंतर मात्र येथील निवडणुकीच्या वेळी आम्ही त्यांना दिल्लीकडून ‘व्याजासहित परत घेऊ.’ मात्र दिल्लीने आमचा घात केला, मुंडेसाहेबांना परत दिलेच नाही, अशी भावना त्यांनी श्रद्धांजली सभेत व्यक्त केली.

वाट्याला कायम दु:ख
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, मुंडे यांनी मराठवाड्याच्या विकासाचा कायम ध्यास घेतला. मराठवाड्याच्या वाट्याला कायम दु:ख आहे. विलासराव आणि मुंडे यांचे नाव घेत ते म्हणाले, येथील नेता विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर एकतर स्वर्गवासी होतो किंवा काहीतरी अडचणीत सापडतो.
..तर ग्रामविकासाला प्राधान्य असते
केंद्रात सत्ता आल्यानंतर मुंडे यांच्या वाट्याला ग्रामविकास मंत्रिपद तर रावसाहेब दानवे यांच्या वाट्याला खाद्य पुरवठा व नागरी संरक्षण खात्याचे राज्यमंत्रिपद आले. दानवे यांनी आपल्या मनोगतात मुंडेंच्या कामाचा संभाव्य प्राधान्यक्रमच विशद केला. दानवे यांनी उसाच्या दराविषयी तर मुंडे यांनी स्वत: पंतप्रधान ग्रामसडक योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची तयारी केली होती. परळीतील सत्कार आटोपल्यानंतर या कामांना आपण सुरुवात करू, असे त्यांनी दानवे यांना सांगितले होते.