आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहो, सांगा ना गुरुजी तास कधी सुरू होणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सध्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, तासच कधी झाला नाही तर पेपर सोडवायचे कसे? असा सवाल कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला केला असून गेल्या तीन दिवसांपासून महाविद्यालयाबाहेर हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
शासकीय कला महाविद्यालयात गेल्या पंधरा वर्षांपासून नियमित शिक्षक नसल्याने तासिका तत्त्वावरचे शिक्षकच अध्यापन करतात. यातील अनेक शिक्षक सोडून गेल्यामुळे तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थ्यांसाठी एकच नियमित शिक्षक असल्याने मंगळवारपासून विद्यार्थी शिक्षक मिळावेत म्हणून आंदोलन करत आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलाकार घडविणाऱ्या या कला महाविद्यालयात प्राचार्यदेखील प्रभारी आहेत. चार अभ्यासक्रम शिकवले जातात; परंतु सर्व शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. कॉम्प्युटर लॅब आहे, पण ती बंद आहे. ग्रंथालय आहे, परंतु तेदेखील ग्रंथपाल नसल्यामुळे बंद आहे.

विद्यार्थी हजार ६६५ रुपये भरून प्रवेश घेतात. मात्र, कोणतीच सुविधा मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आहे.
माजी विद्यार्थी संघटन शाकम २२ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजता आंदोलन करणार आहे.

परीक्षेवर बहिष्कार
आमचे तासच झालेले नाहीत. मग पेपर लिहिणार तरी कसे म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. सुरू असलेली परीक्षा एकाही विद्यार्थ्याने दिली नाही.

गरज २३ जणांची
सध्या एकच नियमित शिक्षक महाविद्यालयात आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सतरा जण आहेत; परंतु प्रत्यक्षात मात्र नियमित शिक्षक महाविद्यालयात नाही. २३ जणांची गरज महाविद्यालयाला आहे. सुविधांसाठी ४२ लाख रुपयांचा प्रस्तावही पडून आहे.

प्रशासनाला कळवले
^महाविद्यालयात असलेल्या रिक्त जागेसंदर्भात आम्ही प्रस्ताव पाठवला आहे. त्यातील काही जागा लवकरच भरण्यात येतील. कला संचालक राजीव मिश्रा यांनादेखील विद्यार्थी आंदोलनाविषयी सांगण्यात आले आहे. -प्रा. भरत गढरे, प्राचार्य
बातम्या आणखी आहेत...