औरंगाबाद - माझी पत्नी बाळंतपणासाठी प्रसूती विभागात दाखल झाली. आमचं पहिलंच बाळ जन्माला येणार होतं. प्रसूती विभागातला प्रत्येक क्षण आमच्यासाठी परीक्षेचा होता. प्रसूतीसाठी पत्नीला आत घेतल्यानंतर डॉक्टर बाहेर आल्या अन् तत्काळ रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. रक्तपेढीत रात्री १२ वाजता गेलो, डॉक्टरांची चिठ्ठी दाखवली. सोशल वर्करने गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब लावता रक्ताची पिशवी दिली. आज बाळ, बाळंतीण आणि आमचा परिवार आम्ही आनंदात आहोत. अनोळखी रक्ताच्या थेंबांनी आमच्या आयुष्याची बाग फुलवली, अशी भावुक प्रतिक्रिया प्रसूती विभागात दाखल महिलेच्या पतीने दिली.
घाटीमध्ये असलेल्या शासकीय रक्तपेढीच्या नावाने नेहमीच बोंब करणारे अनेक जण आहेत. मात्र, वेळेवर उपयोगी येऊन अनेकांना दिलासा देणारीदेखील हीच रक्तपेढी आहे. फक्त घाटीतीलच नव्हे, तर इतर रुग्णालयांतील ६५७ रुग्णांनाही या पेढीने दिलासा दिला आहे. महाराष्ट्रातील ९० शासकीय रक्तपेढ्यांमध्ये चमकदार कामगिरी करत राज्यात पहिला येण्याचा मान औरंगाबादच्या शासकीय रक्तपेढीला नुकताच मिळाला. महाराष्ट्रात एकूण २८९ रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी १९९ खासगी आहेत. सर्वाधिक रक्तसंकलन करणारी पेढी म्हणून या रक्तपेढीला महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या वतीने मुंबईत गौरवण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते हनुमान रुळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रक्तपेढीप्रमुख डॉ. हेमंत कोकंडकर यांच्या मार्गदर्शनात सर्वोत्तम कामगिरी झाली.
समर्पित अभियान
आम्हीसातत्याने शिबिरांचे आयोजन करून रक्तदानाचे महत्त्व पटवून देत असतो. यातूनच गेल्या दोन वर्षांत प्रत्येकी २०९ शिबिरे आयोजित करण्यात आली होती. रक्तसंकलन आणि त्याचे वाटप ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. - सुनीता बनकर, सामाजिक कार्यकर्त्या, घाटी
अखंड प्रक्रिया
प्लेटलेट्स, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा आणि पॅक्ड सेल व्हॉल्यूम अशा तीन प्रकारांमध्ये रक्तघटक वेगवेगळे करून गरजेनुसार रुग्णांना दिले जातात. साथरोगांच्या काळातही मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासते. डॉ.राजन बिंदू, विभागप्रमुख, घाटी
प्रत्येक गोष्टीचे महत्त्व
आयुष्यात एका सेकंदाचे महत्त्व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला विचारायला हवे, एका मिनिटाचे महत्त्व रेल्वेस्टेशनवर रेल्वे पकडण्यासाठी धडपडणार्या प्रवाशाला विचारावे, तसेच अन्नाच्या प्रत्येक घासाचे महत्त्व गरिबाला आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व रुग्णालयात दाखल रुग्णाला विचारायला हवे.