आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतन आयोगाचा बोजा शेतकऱ्यांच्याच डोक्यावर, मराठवाडा विकास समितीचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग देण्याची तयारी सुरू आहे. पण त्यामुळे या सर्व खर्चाचा बोजा कराच्या रूपाने शेतकऱ्यांच्या डोक्यावर लादला जातो. तसेच खासदार, आमदार, नगरसेवक यांच्या मानधनात पाच वर्षांत दुपटीने वाढ करून त्यांना पेन्शनही दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दरमहा १० हजार रुपये पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी मराठवाडा विकास समितीतर्फे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

समितीने निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रासह देशात दर मिनिटाला १५ आत्महत्या होत असल्याचा अहवाल क्राइम ब्युरोने केंद्र सरकारला दिला आहे. कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असून दरमहिन्याला लाख ४८ हजार आत्महत्या होत आहेत. त्यामुळे जनतेचा पोशिंदाच दिवाळखोरीत निघत असेल तर तो आत्महत्या करण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. कर्जबाजारी, दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत आहेत. राज्य सरकारने ६० हजार शेतकऱ्यांना प्रतिमहा १० हजार रुपयांची पेन्शन दिली तर वर्षाकाठी ६०० कोटींचा खर्च सरकारला करावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण निश्चित कमी होऊन त्यांना पर्याय उपलब्ध होऊ शकतो. राज्य शासनाने प्रतिहेक्टरी १५०० रुपयांची शेतकऱ्यांना मदत जाहीर करून त्यांची अवहेलना केली आहे, असा आरोपही मराठवाडा विकास समितीने केला आहे.

शासकीय निमशासकीय कर्मचारी, आमदार, खासदार नगरसेवकांना त्यांच्या मर्जीनुसार महागाई निर्देशांकानुसार मानधनामध्ये भरमसाट वाढ मंजूर होते. शिवाय त्यांना आरोग्याच्या खर्चापोटीही आर्थिक लाभ दिले जातात. असे आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीत. त्यांना वृद्धापकाळात हलाखीचे जीवन जगावे लागते. अशा परिस्थितीत शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन देण्याची योजना लागू करावी अशी मागणी समितीने केली आहे. अन्यथा १७ सप्टेंबर या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापासून राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या मागण्यांचे निवेदन उपायुक्त सामान्य प्रशासन विजयकुमार फड यांना देण्यात आले असल्याचे अॅड.महादेव आंधळे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...