मुंबई - औरंगाबादचे पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व व सध्या महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने औरंगाबादला पर्यटन जिल्हा घोषित केले. हा शासनादेश शुक्रवारी काढण्यात आला.
प्राचीन काळापासून औरंगाबाद परिसर विविध सांस्कृतिक, नैसर्गिक बाबींनी नटलेला आहे. १९१९ मध्ये अजिंठा लेणीचा शोध लागल्यानंतर पर्यटकांचा ओघ येथे वाढला. यानंतरच्या काळात अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमुळे पर्यटनात सातत्याने वाढ होत गेली. युनेस्कोनेही अजिंठा व वेरूळ जागतिक वारसा स्थळ घोषित केल्याने औरंगाबादचे महत्त्व वाढले. याशिवाय अनेक ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकेही औरंगाबादमध्ये असल्याने औरंगाबादचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे.
अधिक निधी मिळेल
काेकणातील सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा. दुसरा मान अाैरंगाबादला मिळाला अाहे. यामुळे निधीचा माेठा वाटा या दाेन्ही जिल्ह्यांना मिळेल. राज्य सरकारचे नवे पर्यटन लवकरच जाहीर केले जाणार असून यात दाेन्ही जिल्ह्यांतील पर्यटनस्थळांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल.