औरंगाबाद- बोरसर (ता. वैजापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा मिळत नसल्याने सहा तासांनंतर निर्मला पवार यांना प्रसूतीसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, तेथेही चार-पाच तास हेळसांड केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनाज डोंगळीकर यांनी येऊन प्रसूती केली, अशी कथा सुधाकर पवार यांनी जनसंवाद कार्यक्रमात जाहीरपणे सांगितली.
जि. प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी जिल्हा समन्वयक समिती मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने जिल्हा आरोग्य देखरेख व नियोजन समितीच्या जिल्हास्तरीय जनसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड होते.
दीड वर्षापासून चौकशी लटकली : या वेळी वैजापूर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुधाकर पवार यांनी सांगितले की, निर्मलाला प्रसूतीसाठी बोरसर येथे आणले. मात्र, सहा तास केवळ हेळसांड करून वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथेही चार तास थांबवून डॉ. डोंगळीकर यांनी तिला डॉ. शिंदेंच्या खासगी रुग्णालयात शेवटच्या क्षणी रेफर केले.
शिंदेंच्या रुग्णालयात डॉ. डोंगळीकर :
शिंदे यांच्या रुग्णालयात डॉ. डोंगळीकर यांनीच येऊन प्रसूती केली. मात्र, मुलगा अपंग जन्माला आला. त्याच्या डोक्याला इजा झाली. हा मुद्दा गेल्या वर्षी मांडण्यात आला होता. तसेच त्याचा अहवाल पाच एप्रिल 2014 रोजी देण्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही हा अहवाल आला नाही. मुलाला 350 रुपयांची औषधाची बाटली नियमित देण्यात येते. जर हे औषध दिले नाही, तर हे मूल अर्धमेले होते. बाळासाठी आतापर्यंत अडीच लाख रुपये खर्च करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
अनेक प्रश्न अनुत्तरित
डॉ. डोंगळीकर खासगी रुग्णालयात का गेले? उपजिल्हा रुग्णालयातून महिलेला का हलवले? तसेच उशीर झाल्यामुळे मुलाच्या व्यंगाला कारणीभूत वैद्यकीय अधिकारीच असल्याचेही सांगण्यात आले. त्यावर संतोष जाधव यांनी समितीने अहवाल देण्यास विलंब केल्याने चौकशी समितीचीच चौकशी करण्याची मागणी केली. या वेळी आरोग्य सभापती बबन कुंडारे, सहायक उपसंचालक डॉ. डी. एन. पाटील, उपसंचालक डॉ. चव्हाण, डॉ. हेमा पिसाळ, मनाजी मिसाळ, संतोष जाधव, अप्पासाहेब उगले, साधना गंगावणे, डॉ. बी. टी. जमादार उपस्थित होते.