आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Hospital Patient Admited In Private Hospital Issue Aurangabad

एनपीए घेऊन खासगी प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरला अभय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना स्वत:च्या खासगी रुग्णालयात पळवणार्‍या शासकीय दंत महाविद्यालयातील डॉ. अर्चना वाघमारे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी केवळ समज देण्याचे सोपस्कार अधिष्ठाता डॉ. एम. बारपांडे यांनी पार पाडले. ‘मला कारवाईचे अधिकारच नाहीत. तक्रारदारानेच याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करावी,’ असे म्हणत त्यांनी हात वर केले. नॉन प्रक्टिसिंग अलाउन्स घ्या व खुशाल खासगी प्रॅक्टिस करा, शिवाय जेथे नोकरी करता त्या शासकीय रुग्णालयाशीही प्रामाणिक राहू नका, असा सल्लाच जणू त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला आहे.

काय आहे प्रकरण? : सांस्कृतिक मंडळासमोरील चौकातून 13 जून 2013 रोजी रात्री दिनेश भालेराव नावाच्या एका तरुणाची गाडी स्लीप झाली. या अपघातात त्याचे दोन दात तुटले. जवळच असलेल्या घाटीतील दंत रुग्णालयात तो उपचारासाठी गेला. तेथे आशिष नावाच्या ट्रेनी डॉक्टरने उपचार करण्याऐवजी खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला त्याला दिला. यावर डीबी स्टारने स्टिंग ऑपरेशन करून रुग्ण पळवापळीचा प्रकार कसा चालतो याचा पर्दाफाश केला. डॉ. आशिष हा कामगार चौकातील नोबेल रुग्णालयात रुग्णांना नेऊन तेथे त्यांच्यावर उपचार करण्याचे काम करत होता. हे रुग्णालय रूपाली दामा नावाच्या डॉक्टरांच्या नावाने असून तेथे ट्रेनी डॉक्टर मेहनाज काम करीत होत्या, तर शासनाचा नॉन प्रॅक्टिस अलाऊन्स घेऊन दंत महाविद्यालयाच्या शल्यचिकित्सक डॉ अर्चना वाघमारे तेथे खासगी प्रॅक्टिस करीत असल्याचा भंडाफोड चमूने केला होता. याप्रकरणी डीबी स्टारने 2 जुलै रोजी ‘डॉक्टरची दुकानदारी,ट्रेनीची दलाली’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या प्रकरणाला वाचा फोडली होती.

त्यांना फक्त समज दिली
वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. आर. बारपांडे यांनी डॉ. अर्चना वाघमारे यांच्याकडून झालेल्या प्रकाराचा खुलासा मागितला व कडक कारवाई करण्याऐवजी त्यांना फक्त सक्त ताकीद देण्यात आली. तुमच्यावर नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही दिला.

थेट सवाल
डॉ. एम. बारपांडे (डीन, दंत महाविद्यालय)

डॉ. वाघमारे यांच्यावर काय कारवाई केली ?
- थेट कारवाईचे अधिकार मला नाहीत. माझ्या अधिकारात त्यांनी पुन्हा असे कृत्य करू नये, अशी ताकीद दिली आहे. त्या तसे पुन्हा करणार नाहीत.
या प्रकरणात तथ्य नसल्याचा खुलासा केला, यावर चौकशी केली का ?
- नाही. त्यांनी दिलेल्या खुलाशाच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केली आहे.
याबाबत वरिष्ठ कार्यालयाला तक्रार केली का ?
- तक्रारदारानेच वरिष्ठ कार्यालयाला तक्रार करावी. पुढील आदेश आल्यानंतर आम्ही प्रकरणाची चौकशी करू.
कारवाई करू नये असा दबाव आहे का ?
मुळीच नाही. माझ्यावर दबावाचा प्रश्नच नाही. कारवाईचे अधिकारच मला नाहीत. मी कारवाई तरी कशी करू ?