औरंगाबाद- घाटी रुग्णालयातील तातडीच्या रुग्ण तपासणी विभागात सोमवारी दोन डॉक्टरांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यात कुणीही मध्यस्थी केली नाही. त्यामुळे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले होते. अचानक घडलेल्या या प्रकाराने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अचंबित झाले होते. मात्र, या घटनेबद्दल घाटी प्रशासनाकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली.ग्रामीण भागात डॉक्टरांचा संप सुरू असल्याने रुग्णांना घाटीशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. लोहगडनांद्रा (ता. फुलंब्री) येथील एका रुग्णाला त्याचे नातेवाईक घाटीत घेऊन आले होते.
दुपारी पावणेबाराच्या सुमारास त्यांनी नावनोंदणी केली. त्यांना तातडीच्या रुग्ण तपासणी विभागात जाण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार ते सीएमओंच्या दालनासमोरील या विभागात गेले. त्यांनी सांगितले की, तेथे त्यांच्याआधीच आठ-दहा रुग्ण होते. डॉ. प्रकाश आणि डॉ. महेश (दोघांची नावे बदलली आहेत) तपासणी करत होते.
इकडे ये, यांना तपास रुग्णांची संख्या अधिक असल्याने डॉ. प्रकाश यांनी डॉ. महेश इकडे ये आणि आधी यांना तपास असे फर्मावले. मात्र, या फर्मानाकडे त्या डॉक्टरने दुर्लक्ष केले. ते पाहून डॉ. प्रकाश यांचा पारा चढला. त्यांनी जोरात ओरडून अरे, तुला ऐकू येत नाही का. इकडे ये आणि या पेशंट्सना आधी तपासून घे, असे सांगितले. त्यावरून डॉ. महेशही संतापले. तावातावाने ते डॉ. प्रकाश यांच्याकडे धावले. कुणाला बोलतोस रे तू, असे म्हणत त्यांच्या अंगावरच चालून गेले.
आता माझी सटकली!
डॉ. प्रकाश यांचाही स्वत:वरील ताबा सुटला. सिंघम चित्रपटाप्रमाणे ‘आता माझी सटकली’ असे म्हणत त्यांनी तुला बघून घेतो, असा इशारा दिला. त्यावर डॉ. महेश यांनी थेट डॉ. प्रकाश यांची कॉलर पकडली. त्याला डॉ. महेश यांनीही तसेच प्रत्युत्तर दिले. एकमेकांच्या श्रीमुखात भडकावण्यापर्यंत दोघांची मजल गेली होती. प्रकरण गंभीर वळणावर जाण्याची चिन्हे दिसत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनीच हस्तक्षेप केला. ‘जाऊ द्या साहेब. तुम्ही भांडू नका. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तपासा’ अशी विनवणी केली. त्यानंतर दोन्ही डॉक्टर अधिष्ठातांकडे निघून गेले. पंधरा मिनिटांनी दोन नवे डॉक्टर तपासणीसाठी आले.