औरंगाबाद- बीड जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रुग्ण पंधरा दिवसांपूर्वी लघवी व पोटाच्या त्रासामुळे घाटीत दाखल झाला होता. विविध वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्याला एचआयव्ही झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यानंतर पंधरा दिवस त्याच्यावर उपचार करून सलाइन लावलेल्या अवस्थेतच त्याला घरीच खाऊपिऊ घाला, असे सांगून डॉक्टरांनी रुग्णाला घरचा रस्ता दाखवला. घाटीत गरीब रुग्णांची पैशासाठी पिळवणूक सुरू असून पैसे न दिल्यामुळेच पतीवर उपचार न करता डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्याचा आरोप रुग्णाच्या पत्नीने केला आहे.
पिंपळगाव येथील उमेश (नाव बदलले आहे) हा शेती कसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. अचानक तिसाव्या वर्षीच त्याला पोटाचा आणि मूत्राशयाचा त्रास सुरू झाला. त्याच्या पत्नीने जालना येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. आठ तास आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर तेथील खर्च झेपत नसल्याचे डॉक्टरांनी घाटीत घेऊन जाण्याचा सल्ला दिला. घाटीत दोन तास फिरवून झाल्यानंतर त्यांना वार्ड क्र. आठमध्ये दाखल करून घेण्यात आले.
दोन-तीन दिवसांनी एमआरआय काढून तपासणी करण्यात आली. त्यासाठी चार हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर केवळ सलाइन आणि काही औषधे देऊन भागवले. पंधराव्या दिवशी डॉक्टरांनी त्याच्या नातेवाइकांना उमेशला घरीच खाऊपिऊ घालण्याचा सल्ला देत डिस्चार्ज दिला. त्या वेळी त्याला सलाइन लावलेली होती. चालताही येत नव्हते. उलट्या, अंगात मुंग्या आणि कमरेखालच्या भागात त्राणच नव्हता. अशा अवस्थेत रुग्णाला डिस्चार्ज दिल्याने नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला. मात्र, आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने ते खासगी दवाखान्यातही जाऊ शकत नव्हते. शेवटी शहरातील नातेवाइकांच्या घरी मुक्काम करत त्यांनी गावाकडचा रस्ता धरला.