आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरात नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्याचे दिले आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर-  कृषी उत्पन्न बाजार समितीकडून महिनाभरापासून तूर खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीचे सविस्तर वृत्त दैनिक दिव्य मराठीत प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार भाऊसाहेब पा. चिकटगावकर यांनी तातडीने तूर खरेदी केंद्र सुरू न केल्यास बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा धडक इशारा जिल्हा प्रशासनाला दिला होता.
 
तूर खरेदी प्रश्नावर आमदार चिकटगावकर आक्रमक झाल्याने धडकी भरलेली जिल्हास्तरावरील सुस्तावलेली प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागे झाली. जिल्हा प्रशासनाने गतिमान हालचाल करत गुरुवारी येथील तालुका प्रशासनाला नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीच्या आवारात तूर खरेदी करण्याचे आदेश बजावले.
 
बाजार समितीच्या वैजापूर आवारात यापूर्वी मनमाड येथील भारतीय खाद्य निगम मंडळाच्या वतीने तुरीची हमी भावाने खरेदी करण्यात आली होती. २२ एप्रिलपासून याठिकाणी शासकीय खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. बाजार समितीचे सभापती काकासाहेब पाटील यांच्यासह ज्येष्ठ संचालक भागीनाथदादा मगर यांनी सातत्याने जिल्हास्तरावर तूर खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी तीनदा लेखी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याची आग्रही भूमिका घेतली होती. तसेच तालुका प्रशासनाकडे बाजार समितीकडे दैनांदिन येणाऱ्या आवक तपशिलासह तूर उत्पादक शेतकऱ्यांकडील व्यापारी बेभाव किमतीने तूर खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक कोंडी होत असल्यामुळे केंद्र सुरू करण्याच्या मागणीवर अधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावरून आदेश प्राप्त नसल्यामुळे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यास असमर्थता दाखवली होती. तूर उत्पादक शेतकऱ्यांकडील तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईचे सविस्तर वृत्त दैनिक दिव्य मराठीने गुरुवारच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाला ३१ मेपर्यंत शिल्लक तूर खरेदी करण्याचे आदेश दिले.  

शुक्रवारपासून केंद्राचे कामकाज सुरू होणार..  
बाजार समितीच्या आवारात नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या देखरेखीखाली तूर खरेदी प्रक्रिया करण्यात येणार आहे.
-विजय सिनगर, सचिव, बाजार समिती
बातम्या आणखी आहेत...