औरंगाबाद- घाटीमध्ये दाखल करण्यात आलेल्या महिला रुग्णाच्या नातेवाइकांनी चार डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर निवासी डॉक्टरांनी मंगळवारी सकाळपासून बेमुदत संप पुकारला आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत संप मिटलेला नसल्याने अनेक रुग्णांची गैरसोय झाली.
याविषयी मार्डचे उपाध्यक्ष डॉ. नयन चौधरी यांनी सांगितले की, सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास
आपत्कालीन सुविधा विभागात अलका रमेश बेहडे यांना दाखल करण्यात आले. या वेळी औषधी िवभागाचे डॉ. हेमंत चिमुटेंसह अन्य तीन डॉक्टर कामावर होते. यामध्ये एक महिला डॉक्टरही होती. डॉक्टरांनी रुग्णावर उपचार सुरू केले. रुग्णाला मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार देण्याची आवश्यकता होती. यामुळे डॉक्टरांनी त्यांना तिकडे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णाचे नातेवाईक काहीही ऐकण्यास तयार नव्हते. इथेच उपचार करा असा हट्ट त्यांनी धरला; पण डॉक्टरांनी असे करता येणार नाही हे सांगितल्यावर दरम्यान 10 ते 15 जणांचा ताफा आला. डॉक्टर हेमंतसह दोघांना कानशिलात लगावत धक्काबुक्की सुरू केली. या घटनेनंतर डॉक्टरांनी बेगमपुऱ्यात हल्लेखोरांविरुद्ध तक्रार दिली.
मुलगी गेल्याचा आईला धक्का
प्रिया रमेश बेहडे ही 10 वर्षांची मुलगी घाटीच्या वॉर्ड क्र. 25 मध्ये दाखल होती. मेंदूत ताप गेल्याने तिचा 10 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मुलीचा डोळ्यांदेखत मृत्यू झाल्याने आई अलका यांना जबर धक्का बसला. त्यामुळे त्यांना झटके येऊ लागले. म्हणून आपत्कालीन विभागात दाखल केले होते.
चूक दोघांची, फटका सर्वांना
या घटनेचे साक्षीदार सामाजिक कार्यकर्ते गौतम खरात या वेळी घटनास्थळी हजर होते. अलका बेहडे यांना मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्या अत्यवस्थ झाल्या. डॉक्टरांनी दाखल करून घेतले. मात्र, परिस्थितीचे गांर्भीय लक्षात न घेता ते 20 ते25 मिनिटे
मोबाइलवर बिझी राहिले. शिवाय रुग्णाला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. आधीच मुलीच्या मृत्यूने धास्तावलेल्या नातेवाइकांचा तोल सुटला आणि त्यांनी धक्काबुक्की केली. डॉक्टरांनीही प्रत्युत्तर दिल्याने वाद वाढला. या प्रकरणानंतर डॉक्टरांनी संप पुकारला. यामुळे घाटीत अनेक संवेदनशील रुग्णांना इतर हॉस्पिटल्सची दारे ठोठवावी लागली.
अजामीनपात्र गुन्हा दाखल करा
निवासी डॉक्टरांना सातत्याने होणाऱ्या मारहाणीसाठी आम्ही सतत प्रशासनाकडे दाद मागत आहोत. हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणे अपेक्षित आहे. मात्र, याविषयी कुठलेच पाऊल न उचलल्याने डॉक्टरांनी सकाळपासून बेमुदत संप पुकारला आहे.
डॉ. हृषीकेश चेवले, अध्यक्ष, मार्ड