आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

३८ वेधशाळांत जीपीएस रेडिओ साउंडिंग तंत्रज्ञान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिल्ली भारतीय हवामान विभागाच्या वतीने पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाचा सूक्ष्म अभ्यास करणे, उपाययोजना सुचवणे आणि हवामानाचा अचूक अंदाज सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशात ३८ ठिकाणी प्रथमच जीपीएस रेडिओ साउंडिंग सिस्टिम तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. त्यात राज्यातील औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई केंद्रांचाही समावेश आहे.

वाढते तापमान, हवामानातील अनपेक्षित बदल, पर्यावरण, प्रदूषण विषयावर जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. याकडे प्रत्येक देशांनी गांभीर्याने बघून वसुंधरेला वाचवण्यासाठी उपाययोजना करावेत, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत, जी 20 परिषद, जागतिक हवामान संस्था, हवामान शास्त्रज्ञांच्या वतीने वारंवार व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने भारतासह अनेक देश प्रयत्न करत आहेत.

देश- विदेशातील हवामानाचा अभ्यास करून हवामानाची अचूक माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय हवामान विभागाने एक पाऊल टाकले असून वातावरणातील घटकांचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी प्रथमच औरंगाबादसह देशातील ३८ वेधशाळांमध्ये रेडिओ सौंदे सूक्ष्म तंत्रज्ञान बसवण्यात आल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेचे सहायक शास्त्रज्ञ पंढरीनाथ साळवे पाटील यांनी "दिव्य मराठी'ला माहिती दिली. विशेष म्हणजे जागतिक प्रमाण वेळेनुसार एकाच वेळी हवामानाचा अभ्यास करणारे बलून आकाशात सोडून त्याद्वारे जागतिक हवामानाची नोंद घेतली जाणार आहे. त्यानंतर शास्त्रज्ञ हवामानातील घटकांचा अभ्यास करून त्याची माहिती, विश्लेषण हवामान बदलाचा अंदाज वेबसाइट, माध्यमांद्वारे शेतकरी, नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहेत. पर्यावरण अभ्यासकांसाठीही हा प्रयोग उपयुक्त ठरणार आहे.
विदेशातील वातावरणही अभ्यासणार
- वातावरणातील तापमान, आर्द्रता, बाष्प, हवा, वादळ आदी प्रत्येक घटकाचा अभ्यास करून हवामान अंदाज वर्तवण्यास मदत होणार, संशोधन उपाययोजना करण्यासाठी होणार फायदा
- या प्रयोगात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे देशविदेशातील हवामान बदल तसेच राज्यात काय परिणाम होणार याची माहिती उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर पाऊस, तापमान, थंडीची लाट, उष्णतेची लाट, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, लायटनिंग, अतिवृष्टी याची माहिती लगेच उपलब्ध करून दिली जाणार आहे.

असा होणार वापर
चिकलठाणा वेधशाळेच्या परिसरात रेडिओ सौंदे अनुभाग मौसम विभाग असे स्वतंत्र कार्यालय उघडण्यात आले आहे. चार शास्त्रज्ञ येथे काम करणार आहेत. संगणकाशी जीपीएस रेडिओ साउंडिंग सिस्टिम, सीफ जीपीएस टीएक्स अॅन्टेना ही सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक यंत्रणा जोडण्यात आली आहे. हायड्रोजन गॅस बलूनमध्ये भरून तसेच त्यात जीपीएस तंत्रज्ञान बसवून तो वातावरणात सोडण्यात येणार आहे. जमिनीपासून आकाशात ते ४० किलोमीटरवर जाईल. जसा जसा बलून वर जाईल तस तसे प्रत्येक सेकंदाला २०० ते ४०० किमी परिघाच्या वातावरणातील तापमान, बाष्प, आर्द्रता, हवेचा वेग आदींची माहिती संगणकाला मिळेल.

एक कोटीचे तंत्रज्ञान
- रेडिओ सौंदे तंत्रज्ञान, ४०१ मेगा हर्ट‌्झ ट्रान्समीटरचा डेटा बलूनसोबत हवेत सोडण्यात येणार आहे.
- एकाच वेळी जागतिक हवामानाची नोंद घेतली जाऊन शास्त्रज्ञ संशोधन, अभ्यास करून हवामानातील अचूक अंदाज वर्तवणार आहेत.
- शेतकरी, शहरी नागरिक, विमान सेवा आदी ठरणार उपयुक्त.