आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहयो लाच प्रकरणातील सहा आरोपींना कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार दडपण्यासाठी 14 लाखांची लाच देणार्‍या सहा आरोपींच्या आवाजाची टेप आमच्याकडे आहे. आरोपींचे संभाषण तांत्रिक परीक्षणासाठी पाठवण्यात येणार असल्याचे सरकारी वकील वाल्मीक शेवाळे यांनी न्यायालयात सांगितले. सहा आरोपींना 7 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. डी. शेटे यांनी दिले.
ग्रामसेवक शरद देशपांडे, किशोर जाधव, निवृत्त गटविकास अधिकारी तेजराव ढगे, शाखा अभियंता तुळशीराम जाधव, मजूर गजानन नवले व कंत्राटदार गजानन वाघ यांच्यासह 70 जणांविरुद्ध सिल्लोड, अजिंठा ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तपास अधिकारी नामदेव मद्दे यांना 14 लाख देताना एसीबीने सहा जणांना हॉटेल मॅनोरमध्ये पकडले. सहा जणांना विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. तांत्रिक परीक्षणासाठी आरोपींच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. आरोपींनी 14 लाख रुपये कुठून आणले, कसे जमा केले, यात अजून कुणाचा हात आहे व फिर्यादी पक्षाला तपासासाठी पुरेसा अवधी मिळाला नाही, असे सांगण्यात आले.
आणखी मासे गळाला लागणार
रोजगार हमी घोटाळ्याच्या प्राथमिक तपासात घोटाळ्याच्या रकमेचा अंदाज लागत नसून या प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वर्तवली. तपासातून बरेच तथ्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पोलिस अधीक्षक कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली रोहयो घोटाळ्याची समिती नेमून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 4 जून 2012 रोजी सिल्लोड तहसीलदारांनी अजिंठा व सिल्लोड पोलिस ठाण्यात ठेकेदार नवले व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 28 जानेवारी रोजी या सर्वांना चौकशीसाठी बोलावले असता लाच देण्याचा प्रयत्न केला गेला. प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिस उपनिरीक्षक नामदेव मद्दे यांनी मजूर तपासण्यासाठी परभणी, जिंतूर, मंठा याठिकाणी जाऊन चौकशी केली. 135 गावांत झालेल्या कामापैकी केवळ 19 गावांतीलच कामे घोटाळ्यात आढळलेली आहे. याप्रकरणी संपूर्ण गावाची कामे तपासल्यास राज्यातील महाघोटाळा उघड होऊ शकतो. घोटाळ्याची व्याप्ती पाहता सध्या आम्ही इतरांनादेखील चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते असेही सिंधू यांनी स्पष्ट केले.