औरंगाबाद - ग्राहकांना ३६५ दिवस किफायतशीर दरात दर्जेदार धान्य, फळे भाजीपाला मिळावा, दलालांची साखळी तोडली जाऊन आणि उत्पादक ग्राहक यांचा थेट संबंध प्रस्थापित होऊन दोघांचीही लूट थांबावी यासाठी शहरात लवकरच धान्य, फळे भाजीपाला विक्रीची शंभर केंद्रे सुरू करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली. शेतकर्यांच्या मालाला भाव मिळाला तरच शेतकरी आत्महत्या थांबतील, अशी पुश्तीही त्यांनी जोडली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शहानूरमियां दर्गा रोड येथील श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये धान्य, फळे, भाजीपाला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद््घाटन पालकमंत्री कदम यांनी गुरुवारी केले. ते म्हणाले, मी शेतकर्याचा मुलगा असल्याने शेतकर्यांना काय कष्ट पडतात याची चांगली जाण मला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकर्यांवर कदापि अन्याय होऊ देणार नाही. कृषी विभागाचा धान्य महोत्सवाचा प्रयोग अतिशय चांगला आहे. येथे दलालांना थारा नाही. उत्पादक ग्राहक दोघेच आहेत. बाजारात व्यापारी ठरवतील तो भाव उत्पादकाला स्वीकारावा लागतो. तेच धान्य, फळे, भाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांना दुप्पट ते तिप्पट किंमत मोजावी लागते. यामध्ये उत्पादक ग्राहक भरडला जातो. दलाल लखपतीचे करोडपती होत आहेत. मात्र, शेतकर्यांच्या हाती काहीच पडत नसल्याने ते आत्महत्या करत आहेत. यावर मात करायची असेल तर अशा प्रकारची बाजारपेठ एक-दोन दिवस नव्हे, तर वर्षभर सुरू असली पाहिजे. यासाठी आजच महापालिका आयुक्त महापौर यांच्याशी चर्चा करून शहरात शंभर ठिकाणी धान्य, फळे भाजीपाला खरेदी-विक्री केंद्रे सुरू करण्यात येतील.
त्यासाठी कृषी विभाग उत्पादकांना सामावून घेतले जाईल. बेरोजगार मुलांनाच (स्टॉल) केंद्र उभारण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. ही बारमाही धान्य भाजीपाला केंद्रे कधी सुरू होणार, असे पत्रकारांनी विचारले असता कदम यांनी त्यासाठी लवकरच असे उत्तर देऊन निश्चित कालावधी सांगितला नाही.
एक हजारात दोन किलो मधाची खरेदी
पालकमंत्री कदम यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचा भाव, शेतकरी कसे पीक पिकवतात, शेडनेट-पॉलीहाऊसचा वापर केला जातो का? याची चौकशी करून सूक्ष्म निरीक्षण केले. भेंडी काय भाव दिली, मधात गूळ-साखरेची भेसळ नाही ना, असे प्रश्न विचारून त्यांनी हजार रुपयांत दोन किलो मध डिस्काउंटमध्ये खरेदी केला. त्यानंतर हायड्रो ऑल पपर्ज फेस, मोगरा आणि दूध पावडर खरेदी केले. खासदार, आमदार, नगरसेवक, अधिकारी कर्मचार्यांनीही येथील दर्जेदार उत्पादने खरेदी करावीत, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
ग्राहकांचे लक्ष वेधले
धान्यमहोत्सवात ८० स्टॉल लागले आहेत. गहू, शाळू ज्वारी, बाजरी या धान्याबरोबरच देवगडचा हापूस, महाराइस, प्रक्रिया केलेल्या वस्तू, लसूण, करडी तेल, डाळी, खरबूज, टरबूज, गूळ, गुलाब सरबत, मध, ओवा, राजगिरा आदी वस्तूंनी ग्राहकांचे लक्ष वेधले.
आणखी एक दिवस वाढवा
ग्राहकांचीरेलचेल बघता महोत्सव एक दिवस वाढवून द्यावा, अशी मागणी कैलास तवार जयाजीराव सूर्यवंशी यांनी करताच कदम यांनी त्यास लगेच मान्यता दिली. यामुळे हा महोत्सव शनिवार (९ मे) रात्री १० पर्यंत चालणार आहे.
सिमेंट बंधार्यांच्या फरेनिविदेच्या आदेशाचा बनाव
दरम्यान,पालकमंत्री रामदास कदम यांनी जलयुक्त शिवार योजनेची गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीत सिमंेट बंधार्याच्या फेरनिविदा काढण्याचे आदेश कदम यांनी िदले आहेत. अंदाजपत्रकीय रकमेच्या १० टक्क्यांपेक्षा कमी निविदा असल्यास त्यांचे रिटेंडरिंग करा, असेही त्यांनी आदेशित केले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या निविदांमधील ४१ निविदांची वर्कऑर्डर देऊन ११७ कामे सुरू झाली असल्याने फेरनिविदांचे पालकमंत्र्यांचे आदेश म्हणजे बनाव असल्याचे बोलले जात आहे.
यांची उपस्थिती
या वेळी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, कृषी सहसंचालक जनार्दन जाधव, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी रमेश गोसावी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, कृषी अधिकारी संतोष आळसे, अशोक आहिरे, उदय देवळणकर, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, संजय शिरसाट, शेतीनिष्ठ शेतकरी त्र्यंबक पाथ्रीकर, जगन्नाथ तायडे, अॅड. वसंतराव देशमुख, कैलास तवार, जयाजी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.