आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतींसाठी मराठवाड्यात आज रणसंग्राम; थेट जनतेतून सरपंच निवडण्‍याची पहिलीच निवडणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यातील १८५४ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी (दि. ७ ऑक्टोबर) मतदान होत आहे. उस्मानाबादमध्ये नवरात्रोत्सवामुळे तेथील मतदान पुढे ढकलण्यात आल्यानंतर उर्वरित सर्व जिल्ह्यांत मतदान होऊन रविवारी मतमोजणी केली जाणार आहे. मतदान निर्भय वातावरणात आणि शांततेत पार पडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त लावण्यात आला असून शुक्रवारी दिवसभर विविध केंद्रांवर निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांचे वाटप करण्यात येत होते. 
 
परभणी; १३ ग्रा.पं.ठरल्या बिनविरोध
जिल्ह्यातील १२६ पैकी १३ ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आल्यामुळे शनिवारी (दि.७) ११३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी मतदान होत आहे.  

ग्रामपंचायत मतदानासाठी कर्मचारी आज शुक्रवारी ईव्हीएम मशिनसह रवाना झाले आहेत. सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या निवडणुकीत गावपातळीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीअस्त्राचा वापर केला जात आहे. जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील २९, सेलू ११, जिंतूर ३३, पाथरी ७, मानवत ८, सोनपेठ ३, गंगाखेड १३, पूर्णा १३ व पालम तालुक्यातील ९ अशा एकूण १२६ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ७ सप्टेंबरपासून सुरू आहे. २७ सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी परभणी तालुक्यातील शेंद्रा, बामणी व हसनापूर-तुळजापूर, गंगाखेड तालुक्यातील शंकरवाडी, बेलेवाडी, नागठाणा, सिरसम, पूर्णा तालुक्यातील मुंबर, सेलू तालुक्यातील डासाळ व जिंतूर तालुक्यातील मांडवा, राजेगाव, वस्सा, वडी या तेरा गावचे सरपंच बिनविरोध निवडून आले. गंगाखेड तालुक्यातील नागठाणा व सिरसम या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये सदस्यपदासाठी १९३१ तर सरपंचपदासाठी ३२६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  

नांदेड जिल्ह्यात तीन तालुक्यांत मतदान
जिल्ह्यातील धर्माबाद, माहूर व बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी सात अॉक्टोबर रोजी मतदान होणार आहे.धर्माबाद तालुक्यातील तीन सरपंचपदाच्या जागेसाठी सहा व १३ ग्रामपंचायत सदस्यपदासाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माहूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायत सदस्यपदाच्या जागेसाठी एकूण ७१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर सदस्यपदासाठी १९८ जागा असून एकूण ३२९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, माहूर तालुक्यातीलच चार गावातील सरपंच बिनविरोध आले आहेत. बिलोली तालुक्यातील दगडापूरच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी बिलोलीचे पहिले आमदार दिवंगत लक्ष्मणराव डांगे यांची नातसून अंजना डांगे या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या आहेत.

हिंगोली; ११६८ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला; २ ग्रा.पं. बिनविरोध
जिल्ह्यात मतदान होणाऱ्या ४९ पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या असून उर्वरित ४७ ग्रामपंचायतीत उद्या ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. रविवारी नवीन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मतमोजणीद्वारे निवडले जाणार आहेत.

हिंगोली तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीत निवडणूक होत आहे. कळमनुरी तालुक्यात कांडली या एकमेव ग्रामपंचायतीत बिनविरोध सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडले गेले. सेनगाव तालुक्यात १० ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत असून औंढा नागनाथ तालुक्यात ७ तर वसमत तालुक्यात १६ ठिकाणी निवडणूक होत आहे. हिंगोली तालुक्यातील १६ पैकी १ म्हणजे ब्रह्मपुरी येथेही बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे आता उर्वरित ४७ ठिकाणी उद्या शनिवारी मतदान होणार आहे. या पाचही तालुक्यात ४७ सरपंचपदाच्या जागांसाठी २०९ उमेदवार रिंगणात आहेत. तर सदस्यपदासाठी ८५९ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या सर्व ११६८ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून सर्वांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. 

औरंगाबाद; २१६ ग्रा.पं.साठी मतदान
जिल्ह्यात शनिवारी २१६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत असून सरपंचपद देखील पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडल्या जाणार असल्याने या निवडणुकांसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.  सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील,अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर राज्य राखीव पोलfस दलांचे जवानाचा खडा पहारा देणार आहे.

जिल्ह्यात प्रथमच सरपंच पदाची निवडणूक ही थेट जनतेतून होत असल्याने या निवडणुकांमध्ये मोठी चुरस वाढली आहे. सरपंच पदावर विराजमान होण्यासाठी अनेकांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने सर्वातोपरी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका भयमुक्त व शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले असून कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

जालना; ३८०० कर्मचारी केंद्रांवर
जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान होत आहे. त्यासाठी ९६० मतदान केंद्र असून मतदान केंद्र अधिकारी, निवडणूक अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष असे जवळपास ३८०० कर्मचारी शुक्रवारी दुपारीच मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.  त्यासाठी २०१ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.   जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. त्यापैकी ८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्याने आता २२४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यामाध्यमातून ७८० ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत.   शुक्रवारी सकाळपासूनच संबंधित मतदान केंद्रांवर कर्मचारी रवाना करण्यात आले. त्यात २७३९ मतदान केंद्र अधिकारी,९६३ मतदान केंद्राध्यक्ष तर १०३ निवडणूक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यासाठी ४९ एस.टी.बस,१३६ जीप व १६ इतर वाहनांद्वारे हे साहित्य रवाना करण्यात आले. 

बीड; २२२४ केंद्रांवर मतदान
जिल्ह्यात ६५३  ग्रामपंचायतींसाठी शनिवारी २२२४ केंद्रांवर मतदान होणार आहे. दरम्यान, ४८  ठिकाणी  सरपंचपदाची निवड बिनविरोध झाली तर ७६९ सदस्यही बिनविरोध निवडून गेेले आहेत. मतदान केंद्राच्या परिसरात १४४ कलम जारी करण्यात आले असून शनिवारी स्थानिक सुट्टी जाहीर  करण्यात आली आहे.  तालुक्यात मतदान केंद्रावर मतदान यंत्र आणी कर्मचारी  घेऊन जाण्यासाठी १० बसची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु  तहसील कार्यालयात आलेली बस बंद पडल्यानेे तिला कर्मचाऱ्यांनाच धक्का द्यावा लागला तेव्हा बस सुरू झाली. निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच केज तालुक्यातील होळ शिवारात बीडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ८ लाख ८३ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केली.  

लातूर; कडक पोलिस बंदोबस्त
लातूर जिल्ह्यात १० तालुक्यांत ग्रामपंचायत निवडणुका होत असून शनिवारी त्यासाठीचे मतदान होणार आहे.  निवडणूक प्रशासन आणि पोलिस दल सज्ज ठेवण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील ३५१ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ३१८७  सदस्यपदासाठी शनिवारी निवडणुका होत आहेत. सरपंचपदाच्या २७ जागा बिनविरोध जाहीर झाल्या आहेत. तर सदस्यपदाच्या ५६७ जागा बिनविरोध जाहीर करण्यात आल्या आहेत.  आजघडीला सरपंचपदाच्या ३२४ आणि सदस्यपदाच्या २५७८ जागांवर चुरशीच्या लढती होत आहेत. यासाठी १२०५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे साडेपाच हजार कर्मचारी आयोगाने नेमले आहेत. दरम्यान, पोलिसांनी १७८ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून ग्राह्य धरली आहेत. निवडणुकीसाठी ८ उपाधीक्षक दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली उर्वरित  पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, कर्मचारी, राज्य राखीव दलाची तुकडी, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...