आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघी नटली पाटोदानगरी! राज्यस्तरीय पथकाचे गुढय़ा उभारून केले स्वागत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छतेचा विभागीय स्तरावरील पुरस्कार पटकावणारे पाटोदा गाव बुधवारी नवरीसारखे नटले होते. सुवासिनींनी घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. अनेकांच्या घरांवर गुढय़ा डौलाने फडकत होत्या. रस्ते आरशासारखे स्वच्छ होते. घरोघरी दारांवर झेंडू आणि आंब्यांची तारणे डुलत होती. एकूणच गुढीपाढवा किंवा एखाद्या सण-उत्सवाचा भास होत होता. राज्य शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेनिमित्त गावात येणार्‍या राज्यस्तरीय समितीच्या स्वागतासाठी गाव सजले होते. या पथकाने गावाची पाहणी करून मूल्यमापन केले.

पुरस्कारासाठी निवड
महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व खान्देश या सहा विभागांतून प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी केलेल्या सर्व 12 ग्रामपंचायतींमधून सर्व निकषांवर होणार्‍या मूल्यमापनातून ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्काराचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या औरंगाबाद तालुक्यातील आदर्श पाटोदा ग्रामपंचायतची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पथकाकडून बुधवारी सकाळपासूनच अंतर्बाह्य पाहणी करण्यात आली. पथकात विजय गवळी, राजन पारकर, समीर सुर्वे, मनोहर बोरकर, राजेंद्र मुंबरकर यांचा समावेश होता. जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे, ग्रामविकास अधिकारी विकास परदेशी, महिला बालकल्याण अधिकारी स्नेहा देव, सतीश औरंगाबादकर, राजेंद्र सोनवणे, संजय वाघ, वसिमोद्दीन नेहरी आदी उपस्थित होते.

पथकाकडून गावाची पाहणी व मूल्यमापन
पाहणी करण्यासाठी गावात दाखल झालेल्या राज्यस्तरीय पथकाकडून संपूर्ण गावातील घरन् घर पिंजून काढण्यात आले. त्यात घराघरांतील स्वच्छतेबरोबरच दैनंदिन सवयी, उपलब्ध साधनसामग्री, ग्रामपंचायतची होणारी मदत, स्वच्छतेबाबत क ाळजी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, पिण्याचे पाणी व त्याची साठवण, सांडपाणी नियोजन, स्वच्छतागृह व त्याचा वापर, गरोदर महिला आणि युवती व बालकांचा आहार, कुपोषण, वृक्ष लागवड, लसीकरणाबाबत जागरूकता आदींची पथकाकडून कसून पाहणी करून त्याची नोंद करण्यात आली.

काही उणे, तर काही अधिक!
पथकाने गावाची कसून पाहणी केली. रस्ते, शाळा, कार्यालय स्वच्छ होते; पण गावकरी व ग्रामपंचायतीने नोंद घ्यावी अशा काही बाबीही समितीने ग्रामस्थांसमोर मांडल्या. गावातील अंगणवाडीत बालकांसाठी असणार्‍या स्वच्छतागृहात आतून कडी लावणे हे नियमबाह्य असूनही आतून लावायची कडी आढळली. अंगणवाडी सेविकांना लसीकरण, आहार आदींची अद्ययावत माहिती असावी, कित्येक घरांमध्ये पिण्याचे पाणी घेण्यासाठी वगराळ्याचा उपयोगच होत नसल्याचे आढळले. काही घरांमध्ये तर वगराळे नव्हते. स्वच्छतागृहाची सफाई व शौचाहून आल्यानंतरची क ाळजी त्यासोबतच प्रत्येक घरात स्वच्छतागृह असावे, सार्वजनिक धोबीघाटाची आठवड्याला स्वच्छता, पाण्याचा अपव्यय आदी गोष्टींवरही पथकाने कटाक्ष टाकला.