आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाच्या सावटातही ग्रा.पं. निवडणुका जोरात, ऑगस्टमध्ये साडेतीनशेवर पंचायतींसाठी होणार मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे अख्ख्या गावासाठी एक सोहळा असतो. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील साडेतीनशेवर पंचायतींसाठी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच पावसाने डोळे वटारल्याचे दिसते. त्यामुळे या निवडणुकांवर दुष्काळाचे सावट असे चित्र रंगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष गावात मात्र तसे दिसत नाही. पाऊस येईलच, असे म्हणत प्रत्येक उमेदवार जोमाने कामाला लागला आहे. सध्या पाऊस नसल्याने कामे नाहीत. परिणामी मतदार तथा ग्रामस्थही याच चर्चेत दिवसभर रंगून असल्याचे दिसते.
पावसाळ्यापूर्वीच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. वेळेत पाऊस झाला अन् या वेळी निवडणुकीचा फड चांगलाच रंगणार, असे सर्वांनाच वाटत होते; परंतु प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हाच नेमके पावसाने डोळे वटारले. मात्र, निवडणुका असलेल्या गावांत फेरफटका मारला असता तेथे दुष्काळाच्या सावटाचे काहीही चित्र नसल्याचे जाणवते. ग्रामस्थ अर्थात शेतकऱ्यांना शेतात फारशी कामे नसल्यामुळे सकाळ संध्याकाळ अशा दोन सत्रांत गावातील पार, होळीवर फक्त निवडणुकीच्याच गप्पांचे फड रंगत आहेत.

सध्या उमेदवार विविध प्रमाणपत्रे मिळवणे तसेच अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात मग्न आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणखी मोठा कालावधी आहे. ज्याने अर्ज सादर केला तो मागे घेणार नाही, याची अजून तरी शाश्वती नाही. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उठलेला नसला तरी गप्पा मात्र जोरात आहेत. पुढील आठवड्यात अर्ज मागे घेतले जातील अन् त्यानंतर खरा प्रचार सुरू होईल. कोण उमेदवार किती खर्च करू शकतो, याची सध्या चर्चा सुरू झाली असली तरी खर्च अपेक्षेप्रमाणे सुरू झाला नसल्याबद्दल मतदारांमध्ये नाराजी असणे साहजिक आहे. खर्च सुरू झाला नसला तरी कोण निवडून येऊ शकतो, कोण बाजी मारू शकतो, अशा गप्पा मात्र घडत आहे. गप्पांचा शेवट मात्र पाऊस यायला हवा, असाच होतो.

सरपंचपद आरक्षित असलेल्या एका गावच्या इच्छुक उमेदवाराने आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. तो म्हणतो, पाऊस नसल्याने यंदाच्या निवडणुकीत खर्च करावा लागणार नाही, असे वाटले होते; परंतु मतदार म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यास त्यांच्या वृत्तीत कोणताही बदल झालेला नाही. जेव्हा निवडणुकीचा विषय निघतो तेव्हा महिन्यापासून पाऊस झालेला नाही, याचे कोणालाही भान राहत नाही.

अनेक शहरवासीही मतदार
शहराचेनागरिक असलेले अनेक जण अजूनही ग्रामपंचायतीचेच मतदार असतात. गावात प्रत्येक मताला महत्त्व असल्याने शहरात स्थलांतरित झालेल्यांना आपले मतदान गावातच ठेवावे लागले. अनेकांची नावे दोन ठिकाणच्या मतदार याद्यांत असत. नव्या नियमानुसार एकाच ठिकाणी मतदान ठेवता येते. त्यामुळे अनेकांनी शहरातील मतदान रद्द करून आपले नाव गावातच कायम ठेवले आहे.