आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडीओंच्या आदेशाचे उल्लंघन; ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - जागेचा बेकायदा घेतलेला फेर रद्द करून मूळ मालकाच्या नावाची नोंद घेण्याच्या बीडीओंच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून नोंदीसाठी दोन लाख रुपयांची मागणी करणा-या वाळूज ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर निलंबनाची कार्यवाही करावी, अशी मागणी महावीर गंगवाल यांनी जिल्हा परिषदेकडे शनिवारी (2 ऑगस्ट) केली आहे.

गंगवाल यांनी जि.प.ला दिलेल्या निवेदनात म्हटले की, येथील झेंडा मैदानाच्या दक्षिणेस त्यांची वडिलोपार्जित जागा (ग्रामपंचायत नमुना ८ प्रमाणे मिळकत क्र. 201 व 202) आहे. या जागेवर ग्रामपंचायतीने तोंडी सांगण्यावरून अन्य व्यक्तीच्या नावे बेकायदेशीर फेर घेऊन नोंदी केल्या होत्या. त्याबाबत गंगवाल यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार केली होती. त्यावरून गंगापूर पंचायत समितीच्या बीडीओंना 27 फेब्रुवारी रोजी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

बीडीओंनी केलेल्या चौकशीत ग्रामपंचायत रेकॉर्डला घेण्यात आलेल्या जागेबाबतच्या बेकायदेशीर नोंदी कोणत्या आधारे घेण्यात आल्या, याबाबत कोणताही उल्लेख नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर संबंधितांना पुरावे सादर करण्यासाठी आठवड्याची मुदत देऊनही त्यांनी पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे बीडीओंनी जागेचा बेकायदा झालेला फेर व त्याच्या नोंदी रद्द करून सात दिवसांच्या आत कार्यालयास अहवाल सादर करण्याचे आदेश ग्रामसेवक एन. के. वाघमारे यांना 11 जुलै रोजी दिले होते. मात्र, ग्रामसेवक वाघमारे यांनी बीडीओंचे आदेश धाब्यावर बसवत प्रकरण 27 जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत मांडले. त्यात जागेच्या मालकाच्या कॉलममध्ये जागामालक गंगवाल यांच्या नावाची नोंद करण्याऐवजी वादग्रस्त जागा असा उल्लेख करून बीडीओंचे आदेश धुडकावून लावले.
दोन लाख रुपयांची मागणी
एक ऑगस्ट रोजी वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात वकील अ‍ॅड. योगेश बोहरा यांच्यासह गेलो असता ग्रामसेवक वाघमारे यांच्याकडे जागेच्या ग्रामपंचायत रेकॉर्डला घेतलेल्या नोंदीची प्रत मागितली. तेव्हा त्यात जागामालक गंगवाल यांच्या नावाच्या कॉलममध्ये चक्क वादग्रस्त जागा म्हणून उल्लेख केल्याचे दिसून आले. त्यासंदर्भात, ग्रामसेवक वाघमारे यांच्याकडे जाब विचारला असता त्यांनी जागेची ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद घेण्यासाठी उपसरपंच खालेद पठाण व मला दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सुनावले, असा आरोपही गंगवाल यांनी केला.
कुणावर अन्याय होऊ नये
ग्रामपंचायतीने घेतलेल्या नोंदी या 20 वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत. त्यानुसार सर्व काही रेकॉर्ड तयार करण्यात आलेले आहे. विनाकारण वाद क ाढून कुणावरही ग्रामपंचायत अन्याय करणार नाही.’’खालेद पठाण, उपसरपंच, वाळूज

सर्वकाही नियमानुसार
ग्रामपंचायतीने घेतलेल्या नोंदी या नियमानुसार घेतलेल्या आहेत. कुठेही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. संबंधितांचा झालेला गैरसमज दूर करण्यात येईल.’’ एन. के. वाघमारे, ग्रामसेवक, वाळूज ग्रामपंचायत