आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजाशी कृतज्ञता हाच जगण्याचा आनंद :साहित्यिक बाबा भांड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समाजात वावरत आपण नोकरी, व्यवसाय करतो. समाजासाठी आपणही काही देणे लागतो ही जबाबदारी ओळखून, समाजाशी कृतज्ञता ठेवून काम करीत आहे. यातच जीवन जगण्याचा आनंद मिळतो. साहित्य संस्कृतीत काम करताना चांगल्या कामाची सुरुवात होऊ शकते, असे मत साहित्यिक तथा प्रकाशक बाबा भांड यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी भांड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. अध्यक्षस्थानी कौतिकराव ठाले पाटील होते, तर साहित्यिक डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. अनिरुद्ध मोरे, आशा भांड, दादा गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ. पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते भांड यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पाटील म्हणाले की, बाबा भांड यांची ‘दशक्रिया’ ही कादंबरी वाचनीय असून एक लेखक, प्रकाशक म्हणून बाबांनी अनेक गोष्टींचे पालन केले. गुणवत्तेशी तडजोड न करता पुस्तके प्रकाशित केली. सामाजिक कार्यासाठी स्वत:ला झोकून देऊन त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ प्रकल्प राबवला. वृद्धाश्रम, मूकबधिर मुलांसाठी शाळा काढून लेखकांना चांगले लेखन करता यावे यासाठी डोंगरपायथ्याशी स्वतंत्र इमारत उभी केली.
डॉ. अनिरुद्ध मोरे म्हणाले, ग्रामीण साहित्य वाचकांच्या काळजापर्यंत नेण्याचे काम बाबा भांड यांनी केले आहे. त्यांच्या लेखनातून अनेक व्यक्तिरेखा रेखाटलेल्या असून ‘लागेबांधे’ या पुस्तकातून ते समोर येते.
कार्यक्रमाला साहित्यिक रा. रं. बोराडे, अनंत काळे, डॉ. छाया महाजन, सुरेश पुरी, लता मुळे, सुधीर कोर्टीकर, मनपा आयुक्त प्रकाश महाजन, रंजन गर्गे आदींसह रसिकांची मोठी उपस्थिती होती.

जिद्द ठेवल्याने
बाबा भांड म्हणाले, सत्कार हा लेखकाला मारून टाकण्याचे काम करीत असतो. परंतु हा सत्कार माझा नसून घरचा सत्कार आहे. माझ्या जडणघडणीत माझ्या गावाचा मोठा वाटा आहे. लेखक होण्यासाठी सायन्सकडे न जाता कला क्षेत्राकडे वळलो. जीवनात अनेक दुष्काळ, अडचणी आल्या. मात्र, मनात जिद्द ठेवल्यामुळे पुढे आलो. साहित्य व संस्कृती मंडळाचे पद तीन वर्षे राहणार असून यात चांगले काम होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.