आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रॅच्युइटीतून पैसे कापले; बोट दाखवले मुंबईकडे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बनकिन्होळा येथे विहिरीत बस कोसळल्यानंतर तिकिटाचे पैसे आणि तिकीट मशीन गहाळ झाल्यानंतर वाहक अंबादास डिंकुटवार यांच्या ग्रॅच्युइटीच्या रकमेतून एसटीच्या औरंगाबाद विभागाने 34 हजार 752 रुपये कपात केले. मात्र हे पैसे परत देण्याची वेळ आली असता संबंधित अधिकार्‍यांनी मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे बोट दाखवले आहे.

बुधवारी ( 4 सप्टेंबर ) डिंकुटवार यांना विभागीय नियंत्रकांची स्वाक्षरी असलेले पत्र मिळाले असून त्यात पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती कळवू, असे नमूद केले आहे. 30 जून 2011 रोजी सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथे बुलडाणा-औरंगाबाद एसटी बस विहिरीत पडली होती. त्यात 19 जणांचा मृत्यू झाला होता.

याच गंभीर अपघातातून डिंकुटवार कसेबसे बचावले. त्यांनी तिकिटाचे पाण्यात ओले झालेले 6 हजार रुपये मंडळाकडे जमा केले. मात्र जीव वाचवताना त्यांच्या हातातील तिकिटांचे इलेक्ट्रॉनिक मशीन विहिरीत पडले. हा हलगर्जीपणा असल्याचा आरोप एसटीच्या कार्यालयात बसलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला. 31 डिसेंबर 2012 नंतर त्यांना 31 वर्षांच्या सेवेपोटी मिळणार्‍या ग्रॅच्युइटीच्या रकमेतून 34 हजार 752 रुपये पैसे कापून घेतले. अपघातानंतर भयभीत झालेल्या डिंकुटवार यांच्या र्शमाचे पैसे कापून महामंडळाने त्यांच्यावर दुसरा आघात केला. डिंकुटवार यांनी हे पैसे परत द्या आणि मला नुकसानभरपाई द्या, अशी मागणी केली. मात्र कोणीही दखल घेतली नाही. अधिकार्‍यांनी त्यांना पैसे कापणे चुकीचे आहे, अशी सहानुभूती दाखवली. मात्र प्रत्यक्षात त्यांना पैसे परत देण्याच्या नावाखाली चकरा मारायला लावल्या. ग्रॅच्युइटीचे पैसे कापणारे अधिकारी मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत.

डिंकुटवार यांच्यावरील अन्यायाबाबत ‘ दिव्य मराठी’ने 17 ऑगस्ट रोजी वृत्तांत प्रकाशित केला. त्यानंतर मंडळाने दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे पत्र पाठवले आहे. एसटी महामंडळ निवृत्तीनंतरही आपला छळ करीत असल्याचा आरोप डिंकुटवार यांनी केला आहे. मला सर्व जण केवळ सहानुभूती दाखवत आहेत. पण कपात केलेले पैसे आणि नुकसानभरपाई दिली जात नसल्याचे डिंकुटवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.