आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रलय: उघड्या डोळ्यांनी पाहिले तांडव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - उत्तराखंडामधील मृत्यूचे तांडव उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर प्रसंगावधान राखत वैजापूर येथील डॉ. मनोज चव्हाण सुखरूप घरी पोहोचले आहेत. मात्र, हा प्रवास प्रचंड खडतर होता. तो त्यांच्यात शब्दात...
येवल्याचे पैठणीचे व्यावसायिक बाळासाहेब कापसे व त्यांचे दोन सहकारी व मी 14 जून रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उत्तरकाशीपर्यंत पोहोचलो. 15 जून रोजी चालकाकडून पूर व रस्ते खचले असल्याची बातमी कळाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही त्यांचा सल्ला ऐकला व परतण्याचे ठरवले. त्यानुसार आम्ही उत्तरकाशीवरून ऋषीकेशला निघालो, परंतु पावसाने धारण केलेले रौद्ररूप व जागोजागी खचलेले रस्ते यामुळे आम्हाला तब्बल 21 तास जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला.

आपण सुखरूप पोहोचू की नाही याची मनात धास्ती होती. अखेर 16 जून रोजी संध्याकाळी आम्ही सुखरूप ऋषीकेशला पोहोचलो. आमच्यासोबतच्या काही जणांनी परतीचा निर्णय न घेता पुढील प्रवास केला. त्यामुळे ते त्याच ठिकाणी अद्यापही अडकलेले आहेत.


नांदेडच्या 61 भाविकापैकी 14 जणांचा अद्याप संपर्क झाला नसल्याची माहिती शनिवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अशोक चव्हाण व पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी उत्तराखंडात अडकलेल्या भाविकांच्या कुटुंबासोबत बैठक घेऊन मदत करण्यासंदर्भात चर्चा केली. रमेश रामराव पांडे (58), उषा रमेश पांडे (55) रत्नाकर अर्धापूरकर (60), स्वरूपा अर्धापूरकर (53), चिंतामणी दिगांबर देशपांडे (69), मंगला चिंतामणराव देशपांडे (67), शरद सडेगावकर पाटील (52), संगीता शरद पाटील (47) आदींचा अद्याप संपर्क झालेला नाही.