औरंगाबाद - काल जे आमच्यासोबत होते ते उद्या कोणासोबत जाणार हे सांगता येणार नाहीत. ते सत्तेचे लोभी आहेत. त्यांना फक्त खुर्चीशी मतलब आहे. त्यामुळे त्यांच्यापासूनही सावध राहा, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष
सोनिया गांधी यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचाही नामोल्लेख टाळत काँग्रेसनेच विकास केला, ते फक्त दावा करताहेत, असे त्या म्हणाल्या. औरंगाबाद व जालना येथील काँग्रेस उमेदवारांसाठी सोनियांची गुरुवारी सभा झाली. त्या म्हणाल्या, शिवसेना-भाजप एकमेकांविरुद्ध लढत असले तरीतेदेखील कोणाबरोबर जातील सांगता येत नाही. या वेळी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते.
तेव्हा मोदी ५ वर्षांचे होते : मोदी विकासाचा दावा करताहेत. मात्र, जेव्हा पंडित नेहरूंनी विकासाची पायाभरणी केली तेव्हा ते फक्त ५ वर्षांचे, तर इंदिराजींनी हरित क्रांती केली तेव्हा १३ वर्षांचे होते.
हे यश मिळाले असते का : राजीव गांधींनी दूरसंचार क्रांती केली नसती तर तुम्हाला हे यश मिळाले असते का, असा प्रश्न त्यांनी केला.
काँग्रेसमुळेच चंद्र, मंगळावर : आपण चंद्र, मंगळावर गेलो, अण्वस्त्रसज्ज झालो ते काँग्रेसमुळेच, असे सोनिया म्हणाल्या.