आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीच्या पावसाचा मोठा फटका, उतरला मिरचीच्या दराचा ठसका; हिरवी मिरची 1800 रुपयांवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हिरव्या मिरचीचे हब म्हणून ओळखले जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात या पिकाचे दर गडगडले आहेत. जुलैमध्ये ६५०० रुपये क्विंटलवर गेलेली हिरवी मिरची आॅगस्टच्या मध्यात २८५० रुपयांवर तर डिसेंबरमध्ये १८०० रुपयांवर आली आहे. दरम्यान, यंदा देशभरात लागवड कमी झाल्याने खरिपात मिरचीची लागवड कमी झाली आहे. यामुळे मिरचीला चांगला भाव मिळण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतात.  


यंदा मिरचीच्या पिकाला सुरुवातीपासूनच नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतोय. मध्य प्रदेशातील मिरचीला किडीच्या प्रादुर्भाव झाला. तर मिरची उत्पादनात  ६५ टक्के वाटा उचलणाऱ्या आंध्र प्रदेश अाणि तेलंगणामध्येही मिरचीचे लागवड क्षेत्र घटले. कर्नाटक २५ टक्के तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश अाणि गुजरातमध्ये देशातील मिरचीच्या एकूण उत्पादनाच्या १० टक्के उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात त्यामानाने चांगले चित्र राहिले. गेल्या वर्षी मिरचीला चांगला दर न मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मिरचीच्या लागवडीकडे पाठ फिरवली आहे. तर विविध रोगांमुळे ही मिरची पिकाचे नुकसान झाले अाहे. त्यामुळे यंदा देशातील मिरची उत्पादन ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता अाहे. गेल्या वर्षी मिरची उत्पादन १८ लाख टनांवर पोहाेचले होते. यंदा ते ११ लाख टनांपर्यंत खाली येणार असल्याचा अंदाज व्यापारी सुजीत पाटणी यांनी व्यक्त केला आहे.  


पीक लागवडीनंतरच्या सुरुवातीच्या काळात कमी पाऊस अाणि त्यानंतर जोरदार पावसामुळे पिकावर परिणाम झाला. अांध्रात मिरची पीक क्षेत्र ४४ टक्क्यांनी कमी झाले अाहे. येथे खरिपात ९२ हजार हेक्टरवर मिरची लागवड झाली होती. तर तेलंगणामध्ये २५ हजार हेक्टर मिरची लागवड क्षेत्र अाहे.  औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या वर्षीचा ८० हजार टन मिरची साठा शिल्लक अाहे. मात्र, यंदा उत्पादन कमी होणार असल्याने मिरचीला चांगला दर मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक बाजारपेठेतून तसेच चीन, बांगलादेश अाणि श्रीलंकेतून मागणी अधिक राहिल्यास दरात वाढ होईल, असे व्यापाऱ्यांना वाटते. जुलैमध्ये मिरचीला ३२५० रुपये क्विंटल दर मिळाला. यानंतर ऑक्टोबरअखेरपर्यंत २८५० होता. तर  नोव्हेंबरअखेरीस मिरचीचा दर १७०० वर घसरला. शुक्रवारी मिरची १८०० रुपये किलोने विकली गेली.  


औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुका, फुलंब्री, आणि सिल्लोड तालुके हिरव्या मिरचीच्या लागवडीसाठी महत्त्वाची समजली जातात. जिल्ह्यात ४ ते ५ हजार हेक्टरवर हिरव्या मिरचीची लागवड होते. यंदा एकट्या सिल्लोड तालुक्यात १ हजार ३८२ हेक्टर क्षेत्रावर हिरव्या मिरचीची लागवड झाली आहे. यात सर्वाधिक सिल्लोड, शिवना, देऊळगाव बाजार, पेंडगाव, शिंदेफळ, केळगाव, आमठाणा, भराडी, घाटनांद्रा सर्कलमध्ये हिरव्या मिरचीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. इथल्या मिरचीला महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, दिल्ली, चेन्नई आणि मध्य प्रदेशातही मोठी मागणी अाहे. दरम्यान, मिरचीचे दर वाढण्याबाबत व्यापारी आशावादी आहे. होलसेल व्यापारी पाटणी म्हणाले, एकूणच घटलेले लागवडीचे क्षेत्र आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे मिरचीला भविष्यात चांगला दर मिळेल.  

बातम्या आणखी आहेत...