आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीन झोनच्या केल्या खदानी, वाळूज एमआयडीसीमधील हरित पट्ट्यात मुरूम चोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कुठल्याही औद्योगिक वसाहतींमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३ टक्के ग्रीन झोन सोडलेले असतात. येथे झाडे लावून ती वाढवणे आणि त्यातून प्रदूषणावर मात करणे हा प्रमुख उद्देश त्यामागे असतो. या ग्रीन झोनची जबाबदारी एमआयडीसी आणि उद्योजकांवर असते. मात्र, येथे ना एमआयडीसीने लक्ष दिले, ना उद्योजकांनी. त्यामुळे आता हा ग्रीन झोन झाडे आणि हिरवळीअभावी ओसाड झाला आहे. एकीकडे शहरभर वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी अनेक लोक झटत आहेत. जिवाचे रान करून एकेक झाड लावत आहेत. तर, दुसरीकडे, आहे ती झाडे तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करणारे हे महाभाग त्यांच्या या प्रयत्नांना खीळ घालत आहेत.
- जेसीबीने जमिनीचे खोदकाम, असंख्य झाडेही तोडली
- बेसुमार खोदकामाविरुद्ध तक्रारी करूनही कारवाई नाही
वाळूज औद्योगिक वसाहतीतील ग्रीन झोनला मुरूम माफियांनी दिवसाढवळ्या सुरुंग लावला आहे. वर्षभरापासून जमीन जेसीबीने पोखरून मुरूम नेला जात आहे. येथील जमीन खोदून अक्षरश: खदानी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे असंख्य झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. या खोदकामामुळे आता हा ग्रीन झोन झाडे लावण्यायोग्यही राहिलेला नाही. यासंदर्भात "डीबी स्टार'चा स्पॉट रिपोर्ट...
जागोजागी खड्डे करून परिसर ओबडधोबड करण्यात आला आहे.
एमआयडीसीचे अधिकारी सोहम वायाळ यांनी रजेवर असल्याचे सांगून बोलण्यास नकार दिला.
संपूर्ण ग्रीन झोनची अवस्था अशी झाली आहे. वरची काळी माती बाजूला सारून हा परिसर एखाद्या खदानीसारख्या करण्यात आला आहे.
मुरूमचोर स्थानिकच
कुठलेही बांधकाम करताना भराव टाकण्यासाठी मुरूम वापरला जातो. या परिसरात असंख्य कंपन्या आणि निवासी वसाहतींची कामे सुरू आहेत. या कामासाठी येथूनच मुरूम उपसला जातो. मुरूमचोरही स्थानिकच असल्याचे येथील नागरिक सांगतात.
झाडांच्या मुळावर घाव
सवेरापॅकेजिंग आणि वोक्हार्ट या दोन्ही कंपन्यांसमोरील ग्रीन झोनमधून मुरूम चोरी करताना माफियांनी निलगिरी, सुबाभूळ आणि इतर देशी झाडे तोडली. खोदकामच असे करण्यात येते की, त्यामुळे झाडांची मुळे बुंधे उघडी पडतात ती उन्मळून पडतात. जी काही थोडीबहुत झाडे उरली आहेत. त्यांच्याही आजूबाजूने मोठमोठे खड्डे खोदल्यामुळे वाऱ्यानेच ही झाडे पडतील अशी स्थिती आहे.

जमीननव्हे, खदानी
याग्रीन झोनमध्ये जमिनीमध्ये साधारणत: दोन फुटांपर्यंत काळी माती होती. याखाली मुरूम लागतो. मुरुमासाठी जेसीबीच्या साह्याने काळी माती बाजूला सारण्यात आली. त्यामुळे आता निव्वळ मुरूम आणि खडकात झाडे लागणे अशक्य आहे. ग्रीन झोनचा उद्देशच यापुढे सफल होईल की नाही, ही शंका आहे.

रात्रीहोते खोदकाम, दिवसा होते चोरी
मुरूममाफिया या ग्रीन झोनमध्ये रात्री अंधारात जेसीबीच्या साह्याने खोदकाम करतात, तर दिवसा ट्रॅक्टरमध्ये त्यातील मुरूम उपसून नेण्याचे काम करतात. या ग्रीन झोनमध्ये अगदी दहा-दहा फुटांपर्यंत खोल खदानी करण्यात आल्या आहेत.

सावेंच्याकंपनीसमोर दिवसाढवळ्या चोरी
विशेषम्हणजे वाळूज एमआयडीसीतील के सेक्टरमध्ये आमदार अतुल सावे यांची सवेरा पॅकेजिंग प्रा. लि. ही कंपनी आहे. या कंपनीसमोरच मोठा ग्रीन झोन आहे. तेथूनही रोज मुरमाचे ट्रॅक्टर भरून नेले जात आहेत. या झोनच्या तिन्ही बाजूंनी अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे सुरक्षा रक्षक, कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार येतो, तरीही त्याबाबत ओरड केली जात नाही.

निश्चित कारवाई करू
"मुरूमचोरी रोखण्यासाठी एमआयडीसी आणि इतर ज्या-ज्या विभागांचा संबंध असेल, त्यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार रोखण्यात येईल. पोलिस आयुक्तांनीही कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.' रामेश्वरथोरात, पोलिसनिरीक्षक, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे

तक्रारी करूनही कारवाई नाही
"एमआयडीसी'कडे आम्ही अनेकदा तक्रारी केल्या आहेत; पण कारवाई होत नाही. पोलिस आयुक्तांनी वाळूज पोलिस ठाण्याला भेट दिली, त्या वेळी आम्हीही तिथे होतो. या प्रश्नावर त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. बालाजीशिंदे, अध्यक्ष,मसिआ
बातम्या आणखी आहेत...