आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगसाठी हवीत शहरातील मैदाने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एम.जी. रोड परिसरातील वाहनांच्या पार्किंगसाठी जिल्हा परिषदेचे हायस्कूल मैदान, तर त्र्यंबक नाका आणि जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावरील वाहनांसाठी महापालिकेचे बी. डी. भालेकर मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आली. आमदार सीमा हिरे यांनी हायस्कूल मैदान देण्याची सूचना मांडताच जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी ते खेळासाठी राहावे, पण बी. डी. भालेकर मैदान जिल्हा परिषदेला वाहनतळासाठी देण्याचे सूचित केले. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही दोन्ही मैदाने पुन्हा एकदा वाहनतळासाठी चर्चेत अाली आहेत.
शहरातील वाढती रहदारी, वाहनतळांसाठी कमी पडत असलेली जागा आणि त्यामुळे रस्त्यांवरच वाहने पार्किंगच्या सुरू झालेल्या पद्धतीमुळे आधीच अपुरे असलेले रस्ते आता अधिकच अरुंद होत आहेत. त्यातही एम. जी. रोड आणि मेहेर सिग्नल ते अशोक स्तंभ या भागात वाहतुकीची अधिकच कोंडी होत असल्याने छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या काही भागात वाहनतळ उभारावेत, ही गेल्या काही वर्षांपासूनची मागणी पुन्हा एकदा नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढे अाली.

आमदार सीमा हिरे यांनी या मैदानावर कुठल्याही एका बाजूला वाहनतळाची व्यवस्था करत त्याची जबाबदारी नाशिक महापालिकेकडे सोपवावी, अशी मागणी केली, तर लागलीच त्यावर जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी हे मैदान यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केल्याचे सांगून, जिल्हा परिषद कार्यालयात जिल्ह्यातील विविध भागांतून येणाऱ्या नागरिकांचा मोठा राबता असतो. जिल्हा परिषद सदस्य, कर्मचारी, अधिकारी यांचीही संख्या अधिक असल्याने आलेल्या प्रत्येकाचे वाहन उभे करण्यासाठी उपलब्ध जागा कमी पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जात असून, या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यासाठी महापालिकेचे बी. डी. भालेकर मैदान जिल्हा परिषदेस वाहनतळासाठी मिळावे. त्यामुळे ही समस्याही मिटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवाय, हे मैदान सध्या वाहनतळासाठीच उपयोगात आणले जात असून, त्यावर खासगी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे ते जिल्हा परिषदेस देण्यास हरकत नसल्याची मागणीही त्यांनी केली.
जिल्हा परिषदेचे हायस्कूल मैदान मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ते खेळांसाठीच राहावे. उलटपक्षी विविध स्पर्धांसाठी मैदान सज्ज करावे. त्यासाठी नियोजन समिती, शासनाकडूनही काही निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना चुंभळे यांनी केल्या.